Sant Tukaram Maharaj Palkhi: भरपावसात ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष! तुकोबांच्या पालखीला देहूकरांचा भावपूर्ण निरोप
Sant Tukaram Maharaj Palkhi: जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या हस्ते सपत्निक महापूजा संपन्न; पिंपरी-चिंचवड आणि महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती.

“सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥
गोड तुझे रूप, गोड तुझे नाम । देई मज प्रेम सर्वकाळ ॥
विठो माउलीये हाचि वर देई । संचरोनि राही हृदयामाजी ॥
तुका म्हणे काही न मागे आणिक । तुझे पायी सुख सर्व आहे ॥”
Sant Tukaram Maharaj Palkhi: संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या अभंगातील भक्तिभाव प्रत्यक्ष अनुभवायला मिळावा, अशा अवर्णनीय वातावरणात श्रीक्षेत्र देहू येथून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे बुधवारी (दि. ८) लाखो वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांच्या साक्षीने भावपूर्ण प्रस्थान झाले. टाळ-मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर, भगव्या पताका, तुळशी वृंदावन आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
भर पावसात तुकोबांच्या पालखीला निरोप देताना अनेक भाविकांचे डोळे पाणावले. इनामदार वाड्यातील पहिल्या मुक्कामानंतर सकाळी शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास पालखीने औद्योगिक आणि शैक्षणिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आकुर्डीकडे प्रस्थान केले. वैष्णवांच्या भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळ-मृदुंगाच्या तालावर सुरू असलेले अभंगगायन आणि हरिनामाचा अखंड गजर यामुळे संपूर्ण पालखी मार्ग भक्तिमय झाला होता.
महापूजा जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने आणि पिंपरी-चिंचवडचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी सपत्निक केली. यावेळी मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगराध्यक्षा पूजा दिवटे,, उपनगराध्यक्षा प्रियंका मोरे, स्मिता चव्हाण, पूनम काळोखे, ज्योती टिळेकर, प्रशासन अधिकारी प्रियंका कदम, महसूल विभागाचे अधिकारी, नगरपंचायतीचे पदाधिकारी, महाराजांचे वंशज आणि मान्यवर उपस्थित होते.
महापूजा संपल्यानंतर इनामदार वाड्यातून पालखी बाहेर पडताच “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक दिंड्या टाळ-मृदुंगाच्या साथीने अभंग म्हणत पालखीच्या पुढे मार्गस्थ झाल्या. पालखीचे दर्शन घेण्यासाठी देहू पंचक्रोशीतील हजारो भाविक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. सुरक्षिततेच्या कारणास्तव कडक पोलीस बंदोबस्त असल्याने काही ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांना दूरूनच दर्शन घ्यावे लागले.
सकाळी साडेअकराच्या सुमारास पालखी प्रवेशद्वार कमानीत पोहोचताच ग्रामस्थांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून तुकोबांना भावपूर्ण निरोप दिला. कमानीतून बाहेर पडताच पालखीने देहूनगरीची प्रदक्षिणा पूर्ण केली आणि गावाच्या वेशीबाहेर पडली. याचवेळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आणि भरपावसात वारीची पुढील वाटचाल सुरू झाली. देहू नगरपंचायतीच्या वतीने जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रत्येक दिंडीतील वीणेकऱ्यांचा पालखी आरोग्य किट, उपरणे आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.






