Shirur : कारेगावच्या यश इन चौकात कचऱ्याचे साम्राज्य; ग्रामपंचायत प्रशासनाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर
Shirur : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारेगाव येथील यश इन चौकात गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचा मोठा ढिग साचल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Shirur : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारेगाव येथील यश इन चौकात गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचा मोठा ढिग साचल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गावाच्या मुख्य चौकातच कचऱ्याचे ढिगारे साचूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
यश इन चौकात साचलेल्या कचऱ्यातून तीव्र दुर्गंधी पसरत असून परिसरातील नागरिक व व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कचऱ्यामुळे डास, माश्या तसेच भटक्या जनावरांचा वावर वाढला असून डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रोसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
स्वच्छता, आरोग्य आणि ग्रामविकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी खर्च केल्याचे दावे ग्रामपंचायतीकडून केले जात असले, तरी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणीच कचऱ्याचे साम्राज्य उभे राहत असल्याने या निधीचा नेमका वापर कुठे होत आहे, याबाबत चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, याबाबत अनेकवेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, कचरा उचलण्यासाठी अथवा परिसर स्वच्छ करण्यासाठी कोणतीही प्रभावी पावले उचलण्यात आलेली नाहीत. परिणामी ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्वच्छ भारत अभियान फक्त कागदोपत्री?
एकीकडे केंद्र व राज्य शासनाकडून स्वच्छ भारत अभियानासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना, दुसरीकडे कारेगावच्या मुख्य चौकात कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसत आहेत. त्यामुळे स्वच्छतेचे अभियान हे केवळ फलक, बॅनर आणि कागदोपत्री अहवालांपुरतेच मर्यादित राहिले आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
“गावाच्या मुख्य चौकातील कचरा तातडीने हटवून परिसराची नियमित स्वच्छता करावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.




