Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा नदीत पवित्र स्नान; सातारा जिल्ह्याचा भावपूर्ण निरोप
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: नीरा नदीच्या दत्तघाटावर पावसाच्या सरींमध्ये रंगला माउलींच्या पादुकांचा स्नान सोहळा; सातारा जिल्ह्याचा मुक्काम आटोपून पालखी रवाना.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi – आषाढी वारीच्या परतीच्या मार्गावर पाडेगाव येथे नीरा नदीवरील दत्तघाटावर माउलींच्या पादुकांना सोमवारी स्नान घालण्यात आले. पावसाच्या सरी, ‘ज्ञानोबा माउली’चा जयघोष आणि हजारो भाविकांची उपस्थितीमुळे दत्तघाट भक्तिरसात न्हाऊन निघाला. सातारा जिल्ह्यातून भावपूर्ण निरोप घेऊन, माउलींचा सोहळा पुढील मुक्कामासाठी वाल्हेकडे मार्गस्थ झाला.
परतीच्या प्रवासातील सातारा जिल्ह्यातील एक दिवसाचा मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने सोमवारी सकाळी पाडेगाव येथून प्रस्थान ठेवले. सकाळी 8.15 च्या सुमारास ग्रामस्थांनी माउलींची पालखी खांद्यावर घेतल्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी 9 च्या सुमारास पालखी सोहळा दत्तघाटावर दाखल झाला. माउलींच्या पादुका सोहळाप्रमुख अॅड. राजेंद्र उमाप यांनी सोहळामालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे सोपवल्या.
‘ज्ञानोबा माउली’च्या जयघोषात माउलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र जलाने स्नान घालण्यात आले. स्नान सुरू असतानाच आषाढ सरींनी जोरदार हजेरी लावली. पावसात चिंब भिजत वारकरी आणि भाविकांनी हा क्षण डोळ्यांत साठवून ठेवला. माउलींच्या पादुकांचे स्नान सुरू असताना, सोहळ्यासोबत असलेले विणेकरी, पताकाधारक आणि डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिलांनी ब्रिटिशकालीन पुलावर रथाच्या पुढे व मागे दोन शिस्तबद्ध रांगा केल्या होत्या.
स्नानानंतर पादुका पुन्हा रथाकडे आणण्यात आल्या. यावेळी आधी रथामागील आणि त्यानंतर रथापुढील वारकर्यांना पादुकांचे स्पर्शदर्शन देण्यात आले. हा भावस्पर्शी सोहळा पाहण्यासाठी पाडेगाव पंचक्रोशीतील भाविकांनी दत्तघाटावर गर्दी केली होती. नीरा नदीतील स्नानानंतर सोहळ्याने सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन, पुणे जिल्ह्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले. पालखी सोहळ्याचा पाडेगाव येथील मुक्काम आणि नीरा नदीतील स्नानावेळी जिल्हा पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते.





