Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: सासवडनगरीत भक्तीचा सागर! ‘माऊली.. माऊली..’च्या जयघोषाने अवघा पुरंदर तालुका दुमदुमला
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव यांच्या पालखी सोहळ्याचा दोन दिवसांचा मुक्काम; टाळ-मृदंगाच्या गजराने वातावरण भक्तीमय.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या दोन दिवसांच्या मुक्कामामुळे सासवडनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली असून ‘माऊली… माऊली…’च्या अखंड जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले आहे. पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे दर्शन घेण्यासाठी पुरंदर तालुक्यासह ग्रामीण भागातून लाखो भाविकांनी सासवडमध्ये गर्दी केली.
सासवड, माळशिरस, भिवडी, बोपगाव, चांबळी, हिवरे दिवे गराडे पिंपळे तसेच तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने सासवडमध्ये दाखल झाले होते. पालखी तळ परिसरात दिवसभर टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग, भजन, कीर्तन आणि हरिनाम सप्ताहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सासवडमध्ये मोठी जत्रा भरली होती. विविध प्रकारची खेळणी, गृहोपयोगी वस्तू, धार्मिक साहित्य, खाद्यपदार्थ आणि पारंपरिक वस्तूंच्या स्टॉल्सवर खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
सासवड नगरपालिकेने पालखी सोहळ्यासाठी व्यापक नियोजन केले आहे. पालखीतळावर आकर्षक विद्युत रोषणाई, दर्शनबारी, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वयंसेवकांची नियुक्ती, आरोग्य सुविधा तसेच नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा केली होती. वीज वितरण विभागाने पालखी मुक्कामादरम्यान अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित केला. वारकऱ्यांच्या गरजेनुसार गॅस सिलेंडर, पिण्याचे पाणी आणि अन्य आवश्यक सुविधांची उपलब्धता करण्यात आली होती.
रोग्य विभागानेही विशेष तयारी केली. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, रुग्णवाहिका आणि आवश्यक औषधसाठा २४ तास उपलब्ध ठेवण्यात आला. उष्माघात, थकवा, रक्तदाब आणि इतर किरकोळ आजारांवर त्वरित उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय पथके सतत कार्यरत होती. सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी विविध ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते. सीसीटीव्ही यंत्रणा आणि नियंत्रण कक्षाद्वारे संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यात येत होती. रविवारच्या मुक्कामानंतर पालखी सोहळा सोमवार (दि. १३) रोजी जेजुरीकडे प्रस्थान करणार आहे. पहाटे माऊलींच्या पादुकांची विधिवत पूजा झाल्यानंतर पालखीचे जेजुरी मुक्कामासाठी प्रस्थान होईल.






