IPL 2025 : “माझ्या हातात असते, तर मी…”, जोस बटलरबद्दल बोलताना सॅमसनचे IPL नियमाबाबत मोठं वक्तव्य

Sanju Samson big statement about Jos Buttler : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन म्हणाला, माझ्या हातात असते, तर मी आयपीएलमधील दर तीन वर्षांनी खेळाडूंना रिलीज करण्याचा नियम रद्द केला असता. कारण तो संघातून अनुभवी जोस बटलरच्या अनुपस्थितीतून अद्याप सावरलेला नाही, असे म्हटले आहे. सॅमसन आणि बटलर हे सात वर्षांपासून राजस्थान संघासाठी खेळत होते. मात्र, मागील हंगामात त्यांना जोस बटलरला रिलीज करावे लागले. इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जोस बटलर आयपील्या १८व्या हंगामात गुजरात जायंट्सचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.
तो माझ्यासाठी मोठ्या भावासारखा – संजू सॅमसन
संजू सॅमसन जिओस्टारशी बोलताना म्हणाला, “आयपीएल तुम्हाला संघाचे नेतृत्व करण्याची आणि सर्वोच्च पातळीवर खेळण्याची संधी देताना जीवलग मित्र बनवण्याचे संधी देते. बटलर माझ्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. आम्ही सात वर्षे एकत्र खेळलो. या काळात आमच्या फलंदाजीच्या भागीदारीचा कालावधी इतका मोठा होता की आम्ही एकमेकांना खूप चांगले समजून घेत होतो. तो माझ्यासाठी मोठ्या भावासारखा आहे. जेव्हा जेव्हा मला काही शंका येत असे तेव्हा मी त्याच्याशी चर्चा करायचो.”
त्याला जाऊ देणे हा घेतलेल्या सर्वात आव्हानात्मक निर्णय –
संजू सॅमसन पुढे म्हणाला, “जेव्हा मी कर्णधार झालो (२०२१ मध्ये) तेव्हा तो उपकर्णधार होता. तेव्हापासून त्याने मला एक चांगला कर्णधार बनण्यास मदत केली. त्याला जाऊ देणे हा माझ्यासाठी घेतलेल्या सर्वात आव्हानात्मक निर्णयांपैकी एक होता. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान मी त्याला सांगितले होते की मी अजूनही त्यातून सावरलो नाही. जर मी आयपीएलमध्ये एक गोष्ट बदलू शकलो तर मी दर तीन वर्षांनी खेळाडूंना रिलीज करण्याचा नियम बदलेन.”
ट्रायल्स दरम्यान राहुल सरांनीच निवड केली होती –
राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ च्या हंगामासाठी सहा खेळाडूंना रिटेन केले होते, ज्यात सॅमसनसह यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर आणि संदीप शर्मा यांचा समावेश आहे. सॅमसन आता संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत पुन्हा एकत्र आल्याने आनंदी आहे. यष्टीरक्षक फलंदाज म्हणाला, “ट्रायल्स दरम्यान राहुल सरांनीच आयपीएलसाठी माझी निवड केली होती. आता ते पुन्हा आमच्या संघाचे मुख्य कोच झाले आहेत, याचा मला आनंद आहे.”





