नवी दिल्ली : व्हाइस अॅडमिरल संजय वत्सायन यांनी शुक्रवारी नौदलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्मा वीरांना आदरांजली वाहिली. व्हाइस अॅडमिरल संजय वत्सायन हे पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून तोफखाना आणि क्षेपणास्त्र प्रणालीतील तज्ज्ञ असलेल्या वत्सायन यांनी आपल्या तीन दशकांहून अधिक काळाच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित नौदल कारकिर्दीत विविध प्रकारच्या सेवेत नेतृत्व, संचालनात्मक तसेच अधिकारी पदांवर जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. नौदल उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी संयुक्त संरक्षण कर्मचारी ऑपरेशन्सचे उपप्रमुख, धोरण, योजना आणि सैन्य विकास विभागाचे उपप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. या काळात त्यांनी तिन्ही सैन्यदलांमध्ये लष्करी मोहिमांचा समन्वय, संयुक्तता, सैन्यविकास तसेच स्वदेशी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणांची आखणी करण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे.