Sanjay Singh : भाजप अफवा पसरवत आहे; संजय सिंह यांचा आरोप
आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह (Sanjay Singh) यांनी रविवारी भाजप आणि राघव चड्ढा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पंजाबमधील आप आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्या निव्वळ अफवा आणि दिशाभूल करणारे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हंटले.

Sanjay Singh : आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह (Sanjay Singh) यांनी रविवारी भाजप आणि राघव चड्ढा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पंजाबमधील आप आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्या निव्वळ अफवा आणि दिशाभूल करणारे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हंटले.
अलीकडेच राघव चड्ढा यांच्यासह पक्षाच्या सात राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्या नंतर पंजाबमधील आपचे आमदार सुद्धा भाजपात जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.
संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीका करताना म्हटले की, राघव चड्ढा आणि भाजप जाणीवपूर्वक राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी खोटी माहिती पसरवत आहेत.
“ज्यांनी आप आणि पंजाबच्या जनतेशी गद्दारी केली, त्यांच्याविरोधात संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट आहे. अशा परिस्थितीत कोणताही आमदार आपले पद धोक्यात घालून त्यांच्यासोबत जाण्याचा विचारही करणार नाही,” असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला.
गेल्या शुक्रवारी राघव चड्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंह, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी आणि स्वाती मालीवाल या सात खासदारांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर तत्त्वांच्या पायमल्लीचा आरोप करत भाजपशी घरोबा केला होता.
राज्यसभेतील १० पैकी ७ खासदारांनी हा निर्णय घेतल्याने, पक्षांतर बंदी कायद्यानुसार हा गट विलीनीकरणाचा दावा करत आहे. मात्र, संजय सिंह यांनी या खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी राज्यसभा सभापतींकडे याचिका दाखल केली असून, हे सर्वजण लवकरच अपात्र ठरतील असा दावा केला आहे. पंजाबमधील जनतेमध्ये या ‘बंडखोरी’ मुळे संताप असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.






