छत्रपती संभाजीनगर : कन्नड येथील शेतकरी संदीप सेठी यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी 10 ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र, या उपोषणाची दखल घेण्यासाठी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपोषणस्थळी जाण्याऐवजी सेठी यांना छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या निवासस्थानी बोलावून ज्यूस पाजून उपोषण सोडवले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिरसाट यांच्यावर असंवेदनशीलतेचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण कन्नड येथील संदीप सेठी यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई, सरसकट कर्जमाफी, नवीन कर्ज मंजुरी आणि बँक वसुली स्थगिती यासह अनेक मागण्यांसाठी 10 ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. पंजाब सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना ठोस मदत मिळावी, अशी त्यांची मागणी होती. उपोषणाच्या नवव्या दिवशी सेठी यांची प्रकृती खालावली होती, तरीही त्यांनी पालकमंत्री शिरसाट यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी येऊन आश्वासन द्यावे, अन्यथा उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. उपोषणस्थळीच त्यांच्यावर वैद्यकीय उपचारही करण्यात आले. पालकमंत्र्यांचा उपोषणस्थळी येण्यास नकार तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सेठी यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तथापि, सेठी यांनी पालकमंत्री शिरसाट यांनी प्रत्यक्ष भेटावे, अशी अट ठेवली. मात्र, शिरसाट यांनी नियोजित कामांचे कारण देत कन्नड येथे येणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यांनी उपोषणकर्त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे आणण्याचा आणि तिथेच उपोषण सोडवण्याचा निरोप दिला. त्यानुसार, सेठी यांना शिरसाट यांच्या निवासस्थानी नेण्यात आले, जिथे त्यांना ज्यूस पाजून उपोषण सोडवण्यात आले.