Sanjay Raut : संजय राऊतांची एकनाथ शिंदेवर जहरी टीका, शहा अन् मोदींचं नाव घेत म्हणाले, तू दोन….

पालघर : शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत हे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित सभेत राऊत यांनी महायुतीतील शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला “वाऱ्यावरचे चित्र” संबोधत राऊत यांनी शिंदे यांना “दोन बापांचा” असा उपहास केला. या सभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, राजकीय वातावरण तापले आहे.
सभेला संबोधित करताना राऊत म्हणाले, पालघरमधील शिवसैनिकांचे मला खूप कौतुक आहे. सगळे शिवसैनिक जागेवर आहेत. मग आपल्यातले तिकडे गेले कोण? पालघरमधील ठेकेदारांची सेना तिकडे गेली. अनेक वादळे आली तरी शिवसेना तशीच कायम आहे. खरे शिवसैनिक कोकणात कायम राहतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
राऊत यांनी शिवसेनेच्या इतिहासाचा उल्लेख करत म्हटले, शिवसेना संपवणारे संपले. पूर्वी आम्हीही चोऱ्या केल्या, पण आता आम्ही सुधारलो. बाळासाहेबांची शिवसेना कधी पैशासोबत वाहत गेली नाही. शिंदेंना जाऊन सांगा, मी तर नेहमीच सांगतो. कोकणातून शिवसेना कधीच नष्ट होणार नाही. हे वक्तव्य करताना त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना कोकणातील शिवसेनेच्या मुळांपासून दूर असल्याचे सांगितले.
राऊत यांच्या भाषणातील सर्वात चर्चेत राहिलेला भाग म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावरचा जहरी प्रहार. ते म्हणाले, आज जे चित्र दिसत आहे, ते वाऱ्यावरचे चित्र आहे. एकनाथ शिंदे, तुझ्या शिवसेनेचा बाप अमित शाह आणि नरेंद्र मोदी आहे आणि तुला दोन बाप आहेत. या वक्तव्याने सभेला टाळ्या पडल्या. राऊत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपच्या “सुभंड” म्हणून चित्रित केले आणि महायुतीतील अंतर्गत कलहावरून त्यांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला.





