मुंबई – शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फोडण्यात गौतम अदानी यांच्या भावाचा सहभाग होता, असा दावा ठाकरेसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, रोहित पवार यांनी अदानींच्या गाडीचे सारथ्य का केले, हे त्यांनाच विचारा, असा टोला देखील त्यांनी लगाविला. राऊत म्हणाले, शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध राजकीय नसून कौटुंबिक आणि व्यक्तिगत आहेत. आपल्या कार्यक्रमाला कुणाला बोलवायचे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी गौतम अदानींना बोलावले असेल आणि त्यासाठी पवारांचे संपूर्ण कुटुंब, ज्यांनी पक्ष फोडला ते अजित पवार सुद्धा उपस्थित असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मुंबईवर मोदींचा आणि भाजपचा मित्र ज्या पद्धतीने ताबा मिळवत आहे, त्याला आमचा नैतिक विरोध आहे. भाजपच्या मदतीने गौतम अदानी मुंबई गिळण्याचा प्रयत्न करत आहेत. टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपती मुंबईत आलेत. पण, ज्या पद्धतीने अदानींना मुंबई गिळण्यासाठी उत्तेजन दिले जात आहे, हे मुंबई आणि मराठी माणसासाठी अत्यंत घातक आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.