“कोणता बदला पूर्ण झाला हे तरी सांगा?” ; संजय राऊतांचा राज्य सरकारला सवाल

Sanjay Raut on Akshay Shinde Encounter । बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. अक्षयने एका पोलीस कर्मचाऱ्याची रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला होता. यानंतर देवाचा न्याय हा हॅशटॅग देशभरात चर्चेत आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले अनेक बॅनर मुंबईत लावण्यात आले असून, त्यावर ‘बदला पुरा’ असं लिहण्यात आलेलं आहे. याच पोस्टरवरून आता विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोणता बदला पूर्ण केला याचे उत्तर सरकारने द्यावे असे म्हटले आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरवर त्यांच्या हातात रिव्हॉल्व्हर (बंदूक) दाखवण्यात आली आहे. तर बदलापूरच्या शाळेच्या विश्वस्तांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यावरूनच संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
या सर्व प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी, “हे स्वतःला सिंघम समजत आहेत. आता महाराष्ट्रात मी सिंघम की तू सिंघम ही चढाओढ सुरू आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या हातात बंदूक दाखवली आहे, जणू यांना परमवीर चक्र देणार आहेत. मोठे शौर्य दाखवले आहे. या महाराष्ट्रात अनेक बलात्कार झाले. ठाणे जिल्ह्यात, नागपूरमध्ये बलात्कार झालेत, किती जणांचे एन्काऊंटर तुम्ही करणार आहात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
‘त्या’ व्यक्ती भाजप आणि संघाशी संबंधित Sanjay Raut on Akshay Shinde Encounter ।
तर दुसरीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी बदलापूर शाळेच्या विश्वस्तांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्यानुसार बदलापूरच्या शाळेतील विश्वस्तांवर मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला कोणाला तरी वाचवायचे आहे. यातले दोन-तीन लोक आहेत, त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही बळी घेतला आहे. पुरावा नष्ट केला आहे. एक याचिका दाखल झाली आहे. त्यात या शाळेत पोर्नफिल्म करण्याचा खेळ सुरू होता. त्या व्यक्ती भाजप आणि संघाशी संबंधित होत्या. असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
‘त्या’ घटनेत फडणवीस गोळ्या घालणार का? Sanjay Raut on Akshay Shinde Encounter ।
नालासोपाऱ्यातील आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 22 वर्षीय तरुणीवर गुंगीचे द्रव्य पाजून सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपींमध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. यावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. कालच नालासोपारामध्ये भाजप पदाधिकाऱ्याला सामूहिक बलात्कारामध्ये अटक झाली. फडणवीस तुम्ही यासाठी काय करणार, घालणार का गोळ्या ? असा सवाल संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.





