‘ऐ… कौन बोल रहा है बालासाहेब ठाकरे?’ ; राज्यसभेत संजय राऊतांचा पारा चढला, चुटकी वाजवत सत्ताधाऱ्यांना झापले

Sanjay Raut in Rajya Sabha । राज्यसभेत ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल २०२५’ वरील चर्चेदरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांमध्ये जोरदार वादविवाद झाल्याचे दिसून आले. या विधेयकावर आपले मत व्यक्त करताना संजय राऊत बोलण्यासाठी उठले त्यावेळी सत्ताधारी पक्षाकडून गोंधळ करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यावेळी संजय राऊतांचा पारा चांगलाच चढला असल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी चुटकी वाजवत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना खडेबोल सुनावले. यावेळी त्यांनी,”जेव्हा हे विधेयक मांडण्यात आले तेव्हा गृहमंत्र्यांनी म्हटले होते की हा देश धर्मशाळा नाही. पण मला हे सांगायचे आहे की हा देश कोणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही किंवा तुरुंगही नाही.” असे त्यांनी यावेळी म्हटले.
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव ऐकताच राऊत संतापले Sanjay Raut in Rajya Sabha ।
राज्यसभेत संजय राऊत यांच्या भाषणादरम्यान सत्ताधारी पक्षाच्या एका सदस्याने शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले. हे ऐकून संजय राऊत संतापले आणि म्हणाले, “कोण बोलत आहे बाळासाहेब ठाकरे? कोण आहे?” त्यांनी चुटकी वाजवत वारंवार सत्ताधारी पक्षाकडे बोट दाखवत विचारले की बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कोण घेत आहे? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
सत्ताधारी पक्षाला लक्ष्य करणे Sanjay Raut in Rajya Sabha ।
सत्ताधारी पक्षावर निशाणा साधताना संजय राऊत यांनी, “हे तेच लोक आहेत ज्यांनी दहा वेळा पक्ष बदलला आहे. त्यांनी आम्हाला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंबद्दल शिकवू नये.” असे म्हटले. तसेच संजय राऊत पुढे म्हणाले, “जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिथे राहणाऱ्या भारतीयांना जबरदस्तीने परत पाठवले, तेव्हा ते चुकीचे होते. जर हा कायदा मंजूर झाला आणि कोणताही अमेरिकन नागरिक येथे बेकायदेशीरपणे राहत असेल, तर त्यालाही त्याच पद्धतीने परत पाठवले पाहिजे.” अशी मागणी त्यांनी वेळी केली. ते पुढे म्हणाले की, “देशात सुमारे ३ कोटी रोहिंग्या आणि बांगलादेशी बेकायदेशीरपणे राहत आहेत, त्यांना हाकलून लावणे आवश्यक आहे. हे काम सुरू करणारे आम्ही पहिलेच होतो.”अशी देखील माहिती त्यांनी यावेळी सभागृहाला दिली.
‘सरकार दहशतवाद्यांच्या मागे झोपले होते’
सरकारवर हल्लाबोल करताना संजय राऊत यांनी , “या देशात आलेले दहशतवादी वैध पासपोर्ट घेऊन आले नव्हते. पण सरकारला याची कल्पनाही मिळाली नाही. म्हणून, माझा सल्ला असा आहे की या विधेयकावर पुन्हा चर्चा व्हावी.” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
इमिग्रेशन आणि फॉरेन बिल म्हणजे काय?
मोदी सरकारने देशाची सुरक्षा आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल २०२५ आणण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याद्वारे, सरकारचे इमिग्रेशन प्रक्रियेवर पूर्ण नियंत्रण असेल आणि परदेशी लोकांकडून नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करता येईल. जर एखाद्या परदेशी नागरिकाने व्हिसा नियमांचे उल्लंघन केले तर त्याला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. या विधेयकामुळे देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांवर कडक देखरेख ठेवली जाईल आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली जाईल.





