Sunil Tatkare : “संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले..”; आमदारांच्या फुटीचे दावे फेटाळत सुनील तटकरेंचा पलटवार
विधानसभा निवडणुका झाल्यापासून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, त्यामुळे ते काहीही बोलत असतात.

Sunil Tatkare – दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलेले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे २० ते ३० आमदार पक्ष सोडणार असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांचा हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, आमचा पक्ष पूर्णपणे एकसंध आहे, असा पलटवार तटकरे यांनी केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे म्हणाले की, संजय राऊत हे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. मात्र, विधानसभा निवडणुका झाल्यापासून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, त्यामुळे ते काहीही बोलत असतात. मनगढंत कथा रचणे आणि सकाळी उठून नवीन नॅरेटिव्ह पसरवणे, एवढेच काम आता राऊत यांच्याकडे शिल्लक राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व ४१ आमदार एकत्र काम करत आहेत. कोणीही पक्ष सोडून जाणार नाही.
फडणवीस यांच्या भेटीचे कारण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना तटकरे यांनी सांगितले की, ही केवळ दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घेतलेली सदिच्छा भेट होती आणि यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. माझ्या रोहा शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी मिळाली असून, त्याच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती त्यांना केल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
विलीनीकरणाच्या चर्चा
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत बोलताना तटकरे म्हणाले, सुनेत्रा पवार यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे की, ज्या गोष्टी ज्या वेळी घडायच्या असतील त्या वेळी सर्वांनाच समजतील. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांमध्ये काही तथ्य आहे, असे मला वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शरद पवार यांची भेट घेणार असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना तटकरे यांनी शरद पवारांप्रती आदर व्यक्त केला.
ते म्हणाले, आमदारांच्या भेटीबद्दल मला कल्पना नाही. परंतु शरद पवार गेल्या सहा दशकांपासून देश आणि राज्यासाठी समर्पित भावनेने काम करत आहेत. त्यांचे योगदान मोठे आहे, म्हणूनच ते रुबी रुग्णालयात दाखल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. २०१५ मध्ये त्यांचा अमृतमहोत्सव साजरा झाला, तेव्हा सर्वपक्षीय नेते त्यांच्या सन्मानार्थ एकत्र आले होते.
त्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी परतल्यानंतर अशा ज्येष्ठ नेत्याची विचारपूस करण्यासाठी जाणे हे अत्यंत स्वाभाविक आहे. शरद पवार यांनीच आम्हाला राजकारणात घडवले आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तो राजकीय विचारधारेचा भाग असू शकतो. मात्र शरद पवार आमच्यासाठी दैवतासमान आहेत, त्यामुळे त्यांना भेटायला जाणे यात काहीही गैर नाही. मी देखील मुंबईत असेन तेव्हा नक्कीच त्यांची भेट घेईन.






