‘सरडासुद्धा आत्महत्या करेल एवढे रंग संजय राऊत बदलतात’; सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ टीकेला शेलारांचं प्रत्युत्तर

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गुलाबी जॅकेट चर्चेत आहे. पण त्यावरून विरोधकांनी लक्ष्य केले आहे. खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून अजित पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या महाराष्ट्राची लाडकी बहीण आहेत.
पण त्यांच्या लाडक्या भावाने रंग बदलला आता ते पिंक झाले आहेत. सरडा रंग बदलतो अचानक ते गुलाबी झाले. आता हा पिंक सरडा बारामती सोडणार आहे पण ते कुठे जाणार आहे हे माहीत नाही, असा टोला त्यांनी लगावला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांना गुलाबी रंगाचा सरडा असे संबोधले.
त्याला प्रत्युत्तर देताना भाजपा आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांनाच सरडा म्हटले. तर, त्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत पलटवार केला आहे.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी याला प्रत्युत्तर देताना ट्वीट केले आहे. सरडासुद्धा आत्महत्या करेल एवढे रंग संजय राऊत बदलतात. सरड्याच्या कुटुंबाने तक्रार केली तर संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल होईल, असे त्यांनी म्हटले आहे.





