“तेलगीने एका रात्रीत 1 कोटी उडवले; मकाऊमध्ये महाराष्ट्रातला माणूस साडेतीन कोटी उडवतो.. माझ्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडीओ”

मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मकाऊ कसिनोमधील एक फोटो ट्विट केला आणि एकच खळबळ उडाली. या फोटोनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे.राऊत (Sanjay raut twitt) यांनी केलेल्या ट्विटमध्ये थेट नाव घेणं टाळलं असलं तरी हा फोटो भाजप (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा असल्याची माध्यमांमध्ये चर्चा सुरु झाली. फोटो ट्विट केल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला. (Chandrashekhar bawankule casino viral photo)
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले,“फोटोतली जी व्यक्ती आहेत, त्यांनी सांगावं की, तो मी नव्हेच.. किंवा त्यांच्या पक्षाने ते व्यक्ती नाहीत हे सांगावं” असं आव्हाहनचं राऊत यांनी यावेळी दिल.”तेलगीने एका रात्रीत 1 कोटी रुपये उडवले. पण मकाऊमध्ये महाराष्ट्रातला एक माणूस जाऊन साडेतीन कोटी रुपये उडवतो, म्हणजे हे अच्छे दिन आ गए. रात्री बारा वाजता रेस्टॉरंटला जातात? साडेतीन कोटीचे पॉईंट्स विकत घेतात, तीन टप्प्यात, ते आरामात तिथे बसतात” अशी टोलेबाजी देखील राऊत यांनी यावेळी केली.
“माझ्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडीओ आहेत. पण आमच्यात थोडी माणुसकी आहे म्हणून थोडी गंमत आहे. ते 27 फोटो आणि व्हिडीओ टाकले तर भाजपला दुकान बंद करावं लागेल” असा इशारा देखील राऊत यांनी यावेळी दिला. ते पुढे म्हणाले,”मी कुणाच्याही व्यक्तीगत आनंदावर विरझण घालू इच्छित नाही. पण महाराष्ट्रात काय चाललंय? सामाजिक वातावरण काय? नुसते आरोप-प्रत्यारोप करुन चालणार नाही” असं देखील राऊत यावेळी म्हणाले.
संजय राऊत यांच्याकडून फोटो ट्विट
19 नोव्हेंबर
मध्यरात्री
मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine.
साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात.
हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे?
ते तेच आहेत ना?@BJP4Maharashtra @AUThackeray @Dev_Fadnavis @AmitShah pic.twitter.com/XlScC63h2Q— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
बावनकुळेंनी दिल स्पष्टीकरण
संजय राऊत यांनी ट्विट केल्यानंतर बावनकुळेंनी देखील आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून याबाबत खुलासा केला आहे. बावनकुळे म्हणतात,”मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे”





