Jasprit Bumrah : “तू है तो दिल…”, लग्नाच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त जसप्रीत बुमराहसाठी पत्नीने शेअर केली रोमँटिक पोस्ट

Sanjana Ganesan share romantic post for Jasprit Bumrah on 4th wedding anniversary : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि त्याची पत्नी संजना त्यांच्या लग्नाचा आज चौथा वाढदिवस साजरा करत आहेत. बुमराहने २०२१ मध्ये अँकर आणि प्रेझेंटर संजना गणेशनशी लग्न केले होते. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या खास प्रसंगी संजनाने बुमराहसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. संजनाने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये बुमराहला टॅग केले आणि त्याच्यासाठी खास कॅप्शन दिले, जे सध्या खूप चर्चेत आहे.
बुमराहची पत्नी संजनाने लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या निमित्ताने इन्स्टावर एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने बुमराहसोबतचा फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये,’तू है तो दिल धडकता है’ या गाण्याची एक सुंदर ओळी समर्पित केल्या आहेत. बुमराह आणि संजना यांना २ वर्षांचा मुलगाही आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये, संजनाने अंगद नावाच्या मुलाला जन्म दिला होता.
संजनाची पती बुमराहसाठी रोमँटिक पोस्ट –
View this post on Instagram
बुमराह आणि संजना यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. हे कपल अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर करतात, ज्यावर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. जसप्रीत बुमराहबद्दल बोलायचे, तर त्याने अलीकडेच त्याच्या फिटनेसबद्दल अपडेट देणारी एक पोस्ट शेअर केली होती. बुमराह सध्या त्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. या दुखापतीमुळे बुमराह आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही.
हेही वाचा – IPL 2025 : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! संजू सॅमसन विकेटकीपिंग करू शकणार नाही? जाणून घ्या कारण
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो पहिल्यांदा इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला. यानंतर, तो टीम इंडियासाठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळू शकला नाही. आता, तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या काही सामन्यांमधूनही बाहेर पडू शकतो. परंतु, बुमराह गेल्या काही आठवड्यांपासून एनसीएमध्ये त्याच्या तंदुरुस्तीवर कठोर परिश्रम घेत आहे. अशा परिस्थितीत, लवकरच चाहत्यांना मैदानावर बुमराहची घातक गोलंदाजी पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.





