IPL 2025 : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! संजू सॅमसन विकेटकीपिंग करू शकणार नाही? जाणून घ्या कारण

Sanju Samson unlikely to keep wicket in IPL 2025 : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या तर्जनीमध्ये फ्रॅक्चर झाले होते. अशा परिस्थितीत, त्याला आयपीएल २०२५ पूर्वी बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने (पूर्वींचे एनसीए) फलंदाजीची परवानगी दिली आहे. मात्र, तो आयपीएलमध्ये यष्टीरक्षक म्हणून जबाबदारी पार पाडू शकेल की नाही याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे. त्यामुळे आगामी हंगामात तो यष्टीरक्षण करणार की नाही जाणून घेऊया.
संजू यष्टीरक्षण करु शकणार की नाही?
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सेंटर ऑफ एक्सलन्समधील फिजिओ सॅमसनच्या कोणत्याही संघर्षाशिवाय फलंदाजी करण्याच्या क्षमतेवर समाधानी आहेत, परंतु, यष्टीरक्षण करताना त्याच्या आरामदायी पातळीकडेही ते बारकाईने पाहू इच्छितात. जर सॅमसनला यष्टीरक्षणाची परवानगी मिळाली नाही, तर ध्रुव जुरेलला यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडू शकतो. जुरेलला फ्रँचायझीने १४ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. संघात दुसरा कोणीही यष्टीरक्षक-फलंदाज नाही.
संजू राहुल द्रविडसोबत काम करण्यास उत्सुक –
दरम्यान, संजू सॅमसन भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत पुन्हा काम करण्यास उत्सुक आहे, ज्यांनी राजस्थानचे कर्णधारपदही भूषवले आहे. सॅमसनने द्रविडच्या नेतृत्वाखालील त्याच्या पदार्पणाची आठवण करून दिली आणि एका दशकापूर्वी या महान फलंदाजाने त्याला कसे पाहिले.
राहुल सरांनी ट्रायल्समध्ये पाहिले होते –
जिओ हॉटस्टारशी बोलताना संजू सॅमसन म्हणाला की, “राहुल सरांनी मला ट्रायल्समध्ये पाहिले होते, ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की तू माझ्या संघासाठी खेळू शकतोस का? तेव्हापासून आतापर्यंत खेळत आहे. आता मी या फ्रँचायझीचा कर्णधार आहे आणि ते परत येत आले आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे.
संजू सॅमसन पुढे म्हणाला, “मी त्यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान संघात एक खेळाडू म्हणून खेळलो आहे जेव्हा ते कर्णधार होते आणि मी त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात खेळलो आहे, जेव्हा ते प्रशिक्षक होते. पण कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातील नाते खूप खास असते आणि मी त्याच्याकडून खूप काही शिकण्यास उत्सुक आहे.”





