भाजपमध्ये प्रवेश करताच संग्राम थोपटेंचा काँग्रेसवर हल्लाबोल; गंभीर आरोप करत म्हणाले, काँग्रेसने…

मुंबई : भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. संग्राम थोपटे यांच्याबरोबरच तीन तालुका अध्यक्ष, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी देखील आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात संग्राम थोपटे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
दरम्यान, संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. पक्षप्रवेशानंतर बोलताना संग्राम थोपटे म्हणाले की, अनेक वर्षांपासून माझ्या वडिलांच्या कार्य काळापासून आम्ही काँग्रेस रुजवली, वाढवली आणि काँग्रेसचा विचार जनसामान्य जनतेपर्यंत पोहोचला. मात्र माझ्यावर ही वेळ काँग्रेसने आणली आहे, असं संग्राम थोपटे यांनी यावेळी म्हटले आहे.
काँग्रेसने माझ्यावर ही वेळ आणली
पुढे बोलताना म्हणाले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते मला वारंवार निर्णय घेण्याचे आवाहन करत होते. मात्र, मी निर्णय घेऊ शकत नसल्याचे मी त्यांना सांगत होतो. मी एका पक्षाच्या विचाराशी बांधील होतो. मात्र, अखेर त्याच पक्षाने माझ्यावर ही वेळ आणली असल्याचा आरोप संग्राम थोपटे यांनी केला आहे.
काँग्रेसने आमच्यावर अन्याय केला : संग्राम थोपटे
राजकारणात संघर्ष करायला करावाच लागतो, त्यातून आम्ही कधीच डगमगलो नाही. माझ्या वडिलांना देखील कित्येक वर्षे संघर्ष करावा लागला. मी देखील संघर्ष केला. त्यातून सहकार संस्था असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, सर्वच ठिकाणी एक हाती सत्ता मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मात्र, काँग्रेसने आमच्यावर वारंवार अन्याय केला, असं संग्राम थोपटे यांनी म्हटले आहे.
कोण आहेत संग्राम थोपटे ?
संग्राम थोपटे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे पुत्र असून, भोर तालुक्यात त्यांचा ठसा आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
संग्राम थोपटेंचा राजकीय प्रवास?
सोनिया गांधींचे निकटवर्तीय अनंतराव थोपटेंचे संग्राम थोपटे पूत्र
संग्राम थोपटेंना वडिलांपासून राजकीय वारसा मिळाला
2002 मध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीमध्ये उपसभापती झाले
2009 मध्ये भोर मतदारसंघातून विजय मिळवत पहिल्यांदा संग्राम थोपटे आमदार झाले
त्यानंतर 2014 आणि 2019च्या विधानसभेत विजय मिळवत संग्राम थोपटेंनी हॅटट्रिक केली
विधानसभेत विजयाची हॅटट्रिक केलेल्या संग्राम थोपटेंना 2024मध्ये पराभव स्वीकाराव लागला.





