Sangram Jagtap : ‘आपले दोन-चार जण आत गेली तरी चालेल, पण… संग्राम जगतापांच पुन्हा वादग्रस्त विधान, राष्ट्रवादीत खळबळ

अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांची मुस्लिम विरोधी वक्तव्यांची धार थांबत नाही. अहिल्यानगरमधील शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मोर्च्यात त्यांनी पुन्हा धक्कादायक विधान केले. “आपल्याला हा देश आणि धर्म सुरक्षित ठेवायचा आहे. त्यासाठी आपले दोन-चार लोक आत गेले तरी हरकत नाही, पण आता लोकांना प्रत्युत्तर द्या,” असा इशारा देत जगताप यांनी मुस्लिम समुदायाला लक्ष्य केले. या वक्तव्याने पक्षात अस्वस्थता पसरली असून, अजित पवारांनी कठोर भूमिका घेतली आहे.
अहिल्यानगरमध्ये काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आक्षेपार्ह पत्रक भिरकावले गेले होते. यानिमित्त शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, यात संग्राम जगताप आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर सामील झाले.
नवरात्रोत्सवात काही फलकांमुळे तेढ निर्माण झाल्याचा आरोप करत जगताप यांनी सलग वादग्रस्त बोलणे केले. यापूर्वी त्यांनी ‘मुस्लिमांकडून खरेदी करू नका’ असे आवाहन केले होते. यानंतर अजित पवारांनी नाराजी व्यक्त करत कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. पण नोटीशीचा काही परिणाम झाला नाही.
‘इथे सिरीया कायदा हवा का?’ जगतापांचा मुस्लिमांना सवाल
मोर्च्यात बोलताना संग्राम जगताप म्हणाले, नवरात्रोत्सवात णीवपूर्वक फलक लावून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर गोमांस टाकण्यात आले होते. आम्ही आरोपी अटक करण्याची मागणी केली आणि आश्वासन मिळाल्यावर रस्ता रोको मागे घेतला. पण नंतर मुस्लिम रस्त्यावर बसले आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला तरी ते उठले नाहीत. मग त्यांना इथे सिरीया कायदा हवा आहे का? त्यांना वाटले की गर्दी पाहून पोलिस घाबरतील, पण प्रशासनाने त्यांना जागा दाखवली, असं जगताप यांनी म्हंटले.
याशिवाय, एमआयएमचे नेते अहिल्यानगरला आले आणि आंबेडकरांचा अवमान झाल्यावर निषेध केला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हे लोक संविधान मानतच नाहीत. दोन समाजात तेढ वाढवण्यासाठी मुस्लिम युवकाने आंबेडकर पुतळ्याजवळ पत्रक भिरकावले. पण पोलिसांनी तात्काळ कारवाई केली, असेही ते म्हणाले.
‘मुस्लिमांनीच पत्रकं वाटली, आता तक्रार करतात’
जगताप म्हणाले, ईदच्या वेळी ते पत्रके वाटतात, ज्यात ‘ईदची खरेदी आपल्याकडून करा, जकात काढाल तर बाकी लोक हत्यार काढतील’ असं लिहिलेलं असतं. आपल्याच लोकांकडून खरेदी करा हे ते सांगतात, आता मी सांगितलं तर तक्रार करतात. हे लोक फक्त आपल्या फायद्यासाठी असतात, असं जगताप म्हणाले.
‘हे विधान चुकीचं, जबाबदारीने वागा’; अजित पवारांची कठोर भूमिका
अजित पवार म्हणाले, “संग्राम जगतापांचं विधान पूर्णपणे चुकीचं आहे. पक्षाच्या धोरणांनुसार असं बोलणं मान्य नाही. अरुणकाका जिवंत असताना अहिल्यानगरमध्ये सर्व काही ठीक होतं. आता आम्हाला अतिरिक्त ओझं वाटतंय. वडिलांच्या छत्रछायेत नसताना जबाबदारीने वागा.” पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवली असून, जगताप यांनी स्पष्टीकरण दिलं: “धर्म विचारूनच मारलं जातंय.”





