Sangli Crime : मिरजेत देशी बनावटीचे 5 पिस्टल व 5 जिवंत काडतुसे जप्त; दोघांना अटक
Sangli Crime : मिरज शहरातील कमानवेस येथे काल दि. ११ रोजी रात्री ११.०८ वाजता रममातानगर ऑक्सिजन पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघे जण सॅकमधून देशी बनावटीचे पिस्तुल विक्रीसाठी येणार आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकातील पोहेकॉ अमोल ऐदाळे, सोमनाथ गुंडे व पोकॉ रोहन घस्ते यांना मिळाली.

Sangli Crime : मिरज शहरातील कमानवेस रमामातानगर ऑक्सिजन पार्क परिसरात देशी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बनावटीची पाच पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे व एक मेहंदी रंगाची सॅक असा एकूण दोन लाख ५१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिरज शहरातील कमानवेस येथे काल दि. ११ रोजी रात्री ११.०८ वाजता रममातानगर ऑक्सिजन पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघे जण सॅकमधून देशी बनावटीचे पिस्तुल विक्रीसाठी येणार आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकातील पोहेकॉ अमोल ऐदाळे, सोमनाथ गुंडे व पोकॉ रोहन घस्ते यांना मिळाली.
त्याठिकाणी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीसमोर दोन व्यक्ती सॅक घेऊन थांबलेले पथकाला दिसले. त्यांना पळून जाण्याची संधी न देता पोलीस उप निरीक्षक महादेव पोवार यांनी ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्यांची अंगझडती केली असता अश्विन संजय माळी याच्या पाठीवरील सॅकमध्ये चार देशी बनावटीचे पिस्तुल व चार जिवंत काडतुसे मिळाली. अमन ऊर्फ मोहिद्दीन बशीर गोदड याच्या कमरेस खोचलेले १ देशी बनावटीचे पिस्तुल व १ जिवंत काडतूस मिळाले.
चौकशीत अश्विन माळी याने सांगितले की, एकूण ५ पिस्टल व ५ काडतुसे विक्रीसाठी आणली होती. पैकी १ पिस्टल व १ काडतूस याआधीच अमन गोदड यास दिले होते. तसेच सुरज जगन्नाथ मोहिते याच्याकडून खरेदी करून अक्षय पाटील (रा. वाई, जि. सातारा) याला विक्री करण्याची कबुली दिली.
या प्रकरणी अश्विन संजय माळी (वय २६, रा. माळीनगर, ता. कडेगाव, जि. सांगली), अमन ऊर्फ मोहिद्दीन बशीर गोदड (वय २६, रा. टाकळी रोड, मिरज, ता. मिरज) या दोघांना अटक करण्यात आली. सुरज जगन्नाथ मोहिते (रा. सोहली, ता. कडेगाव) व अक्षय पाटील (रा. वाई, जि. सातारा) ही नावे तपासात आली असून दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे व पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली अमित परिट, अनिल ऐनापुरे, अमोल ऐदाळे, सोमनाथ गुंडे, आमसिद्ध खोत, प्रकाश पाटील, अमोल लोहार, संदीप पाटील, पोना श्रीधर बागडी, अनंत कुडाळकर, रोहन घस्ते, सोमनाथ पतंगे, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय पाटील यांनी ही कारवाई केली.




