लेकीचं सेलिब्रेशन ठरलं शेवटचं ! कार कॅनॉलमध्ये कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Sangli accident । सांगलीत एका कुटुंबावर काळाचा घाला पडला आहे. सांगलीच्या तासगाव – मणेराजुरी मार्गावर काल मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. तर या दुर्घटनेत एकजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचणी तासगाव – मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी ऑल्टो कार थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. पाणी नसल्यामुळे हा कॅनॉल कोरडा होता. त्यामुळे वेगात असलेली ऑल्टो कार कॅनॉलमध्ये जोरात आदळली गेली. या जबर धक्क्याने कारमधील सहा जण जागीच ठार झाले. तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे.
कारमधील सहा जण जागीच ठार Sangli accident ।
या दुर्घटनेतील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जाते. हे कुटुंब तासगावमधीलच होते. अपघाताच्यावेळी ऑल्टो कारमध्ये एकूण सात जण होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय तासगाववरून वाढदिवसासाठी कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात झाला. चालकाच्या डोळ्यांवर झोप असल्याने त्याला डुलकी लागली असावी आणि कार थेट कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये तीन लहान बालकांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
रात्रीची वेळ असल्याने वेळेवर मदत मिळाली नाही Sangli accident ।
कार वेगात असल्यामुळे जोरात कोरड्या कॅनॉलमध्ये आदळली. यामध्ये कारचे बोनेट आणि पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. त्यामुळे गाडीत बसलेल्या लोकांना जबर मार लागला. हा अपघात झाला तेव्हा रात्रीचा दीड वाजला होता. त्यावेळी आजुबाजूला कोणीही नव्हते. परिणामी या कुटुंबाला वेळेत मदत मिळाली नाही. बुधवारी पहाटे एका व्यक्तीला हा प्रकार समजल्यानंतर त्याने आरडाओरड करत याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वर्दी देत गावकऱ्यांनी बचावकार्य सुरु केले.
या अपघातात राजेंद्र जगन्नाथ पाटील ,सुजाता राजेंद्र पाटील, प्रियांका अवधूत खराडे, ध्रुवा (3), कार्तिकी (1 ), राजवी (2) यांचा मृत्यू झाला आहे. तर स्वप्नाली विकास भोसले या गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.





