संघ, अयोध्या, महिला आणि मुस्लिम ! लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती

नवी दिल्ली – येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्याकरता भारतीय जनता पार्टीने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील इतर संघटना या सोहळ्यासाठी प्रचंड तयारी करत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आजच अयोध्येला भेट देत तयारीचा आढावा घेतला. दिल्ली ते उत्तर प्रदेश भाजप आणि संघ परिवारातील सर्व संघटना कामाला लागल्या असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेच भारतीय जनता पार्टीची सगळी मांडणी सुरू आहे.
उत्तर प्रदेशातून ८० खासदार लोकसभेवर जातात. त्यामुळे योगींच्या नेतृत्वाखालील या राज्यातील सरकार हा कार्यक्रम थाटात संपन्न व्हावा यासाठी झटत आहे. योगी यांनी आजही अयोध्येत हनुमान गढी येथे व नंतर राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. शेजारच्या बिहार राज्यात लोकसभेच्या ४० जागा आहेत. ही दोन राज्ये मिळून लोकसभेवर १२० खासदार जातात. राम मंदिराची वातावरण निर्मिती उत्तर प्रदेशप्रमाणेच बिहारमध्येही करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या १२० जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकल्या तर तिसऱ्यांदा दिल्लीची सत्ता काबिज करण्याचा पक्षाचा मार्ग मोकळा होणार आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य व्हावा यासाठी भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही मदत होते आहे. येत्या २४ मार्चपर्यंत तब्बल अडीच कोटी भाविकांना दर्शनासाठी अयोध्या येथे आणण्याचे उद्दिष्ट संघाने ठरवले आहे. प्रत्येक १०० भाविकांमागे संघाचा एक स्वयंसेवक भाविकांची सर्व व्यवस्था पाहण्यासाठी नियुक्त करण्यात आला आहे. खास भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या टेंट सिटीमध्ये भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय अयोध्येतील प्रत्येक घरी एक चिठ्ठी पाठवण्यात आली आहे. भाविकांच्या भोजनासाठी अयोध्येतील प्रत्येक घरातून पोळ्या मागवण्याची संघाची योजना आहे.
मुस्लिम मतदारांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न
भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी पक्ष किंवा केवळ हिंदुंचा पक्ष आहे अशी या पक्षाची प्रतिमा आहे. मात्र या पक्षाचे मुस्लिमांच्या मतपेढीकडेही लक्ष आहे. त्याकरता स्वतंत्र कार्यक्रम राबवले जात आहेत. देशातील सगळ्यांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात १५ जानेवारी रोजी शुक्रीया मोदी भाईजान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही काळापासून संघाकडून मुस्लिम समुदायातील बुध्दीवाद्यांशी संवादाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यांच्याशी नियमित चर्चाही केल्या जात आहेत. दिल्लीत आणि अन्यत्र अशा बैठका सुरू असल्याच्या बातम्या मध्यतंरी प्रकाशित झाल्या होत्या आणि संघाने याकरता एक विशेष आघाडीही स्थापन केली आहे.
महिलांवरही फोकस
काही आठवड्यांपूर्वी मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या तीन राज्यांत झालेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयात महिलांचा मोठा वाटा असल्याचे लपून राहीलेले नाही. त्यामुळे देशातील निम्मे लोकसंख्या असलेल्या महिला मतदार वर्गावर भाजपचा विशेष फोकस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१४ आणि २०१९ मधील विशेषत: २०१९ मधील विजयात महिलांचा मोठा वाटा होता. त्यामुळे भाजपच्या महिला मोर्चाची दिल्लीत बैठक झाली. लवकरच पंतप्रधान मोदी महिलांसाठी एका मोठ्या योजनेची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.





