हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील चंदनाच्या झाडाची चोरी; चोरटे जेरबंद, 2 पोलिस निलंबित

हिंगोली: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या शिवाजीनगरातील शासकीय निवासस्थानाच्या आवारातील चंदनाचे झाड चोरट्यांनी तोडून चोरल्याची धक्कादायक घटना ११ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत दोन चोरट्यांना नर्सी फाटा येथे सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी रात्रीच्या वेळी कंपाऊंड वॉलच्या आतील बाजूस असलेले चंदनाचे झाड तोडले. याप्रकरणी शिवप्रसाद शिंदे यांच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या सूचनेनुसार, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना आणि पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. पथकाला चोरटे कुरूंदा येथून नर्सी फाटा मार्गे रिसोडकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून जावेद इस्माईल कुरेशी आणि शेख अन्वर शेख जानी (दोघेही रा. कुरूंदा) यांना अटक केली. त्यांच्याकडून चंदनाच्या झाडाचे गाभ्याचे तुकडे, कुऱ्हाड, किकरा, कानस आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली.
दरम्यान, या घटनेत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानावरील गार्ड ड्युटीवर असलेले दोन पोलिस अंमलदार साळूजी कपाटे आणि प्रकाश सोनटक्के यांना पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी निलंबित केले. १० ऑगस्ट रात्री ८ ते ११ ऑगस्ट सकाळी ८ या कालावधीत त्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचे आदेशात नमूद आहे.





