हिंगोलीत धक्कादायक प्रकार: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातून चंदनाचे झाड चोरीला

हिंगोली : हिंगोली शहरातील जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या सरकारी निवासस्थानाच्या अंगणातून चंदनाचे झाड चोरट्यांनी तोडून पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सोमवारी (दि. ११) हिंगोली शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना रविवारी (दि. १०) रात्री घडली. सकाळी माळी शिवप्रसाद शिंदे यांना चंदनाचे झाड गायब झाल्याचे आढळले. त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी गुप्ता यांना याबाबत माहिती दिली. शहर पोलिसांना कळवताच पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार पोटे, अशोक धामणे, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे आणि शेख मुजीब यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोन ते तीन संशयित व्यक्ती झाडाजवळ दिसून आल्या. मात्र, त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने ओळख पटवणे कठीण झाले आहे. सध्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, चंदनाच्या झाडांच्या चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनी लवकरच संशयितांना ताब्यात घेण्याचे आश्वासन दिले आहे.





