कोल्हापूरात परप्रांतीय चोरटे जेरबंद; 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर – परराज्यातून येवून शहरात भरदिवसा घरफोडी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने जेरबंद केले. त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन, तर कराड येथील घरफोडीचा 1 गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून 5 तोळे सोने, चांदी, 1 मोटार असा सुमारे 8 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रिजवान निजामुद्दीन शेख (वय 28, मुळ रा. बिजनौर, उत्तरप्रदेश), जयसिंह हिरनीसिंह कश्यप (वय 25, रा. बिजनौर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचे साथिदार महंमद मुन्तियाज सुप्खे, महमंद अजहर सरफराज (दोघेही रा. बिजनौर, उत्तरप्रदेश) हे दोघे पसार झाले आहेत. शहरातील वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर शहरात गस्त घालत असताना सायबर चौक येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास एक मोटार संशयास्पदरित्या थांबलेली दिसून आली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मोटारीतील रिजवान शेख, जयसिंह कश्यप यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्या चांदीचे दागिने मिळून आले. याबाबत त्यांना अधिक विचारले असता त्यांनी महंमद सुप्खे, महंमद सरफराज यांच्या मदतीने राजारामपुरी परिसरात 2, तर कराड येथे 1 घरफोडी केल्याची कबूली दिली.
पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, विनायक सपाटे, पोलीस अंमलदार अमोल कोळेकर, संदीप कुंभार, अजित वाडेकर, सागर कांडगावे, रफिक आवळकर, संतोष पाटील, महेज गवळी यांच्यासह सायबर पोलीस ठाण्याचे अमर वासुदेव, सचिन बेंडखळे, विनायक बाबर, अनिता फारणे यांनी ही कारवाई केली.





