police suspended – ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना कळवा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेताना गंभीर त्रुटी केल्याप्रकरणी ठाणे पोलीस दलातील नऊ पोलीस कर्मचारी निलंबित झाले. हे प्रकरण ताजे असतानाच, भिवंडीत बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याने ६ पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. यामुळे गेल्या दोन दिवसात एकूण १५ पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथील ५ आरोपींना भिवंडी न्यायालय येथे हजर करण्यासाठी ठाणे पोलिसांनी पथक नेमले होते. पथकाच्या ताब्यात असलेल्या आरोपीमध्ये भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बलात्काराच्या आरोपाखाली अटक असलेल्या सलामत अली अन्सारी (३२) याचा समावेश होता. सलामत हा मूळचा बिहार राज्यातील मधुबन जिल्ह्याचा रहिवासी असून तो सध्या भिवंडीत राहात होता. त्याला पथकाने न्यायालयात हजर केले असता, तो गर्दीचा फायदा पोलिसांच्या रखवालीतून पळून गेला. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पळून गेल्याने कर्तव्यावर सतर्क न राहता निष्काळजीपणा आणि हालगर्जीपणाचे कृत्य करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम क्र.३ (तीन) चे उल्लंघन केले आहे, असा ठपका पथकातील ६ पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. ठाणे पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांनी ही कारवाई केली आहे.