sandalwood smuggling : निसर्ग संपत्तीवर डल्ला ; चंदनाच्या झाडांची तोड करताना तिघे गजाआड

प्रभात वृत्तसेवा
नसरापूर – भोर तालुक्यातील वीरवाडी परिसरात चंदन तस्करीचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी विजय संपतराव शिळीमकर (वय ५३, रा. वीरवाडी, ता. भोर, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी (दि.५) रोजी ते आपल्या शेतामध्ये असताना काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तेथे जाऊन पाहिले असता काही व्यक्ती चंदनाच्या झाडाचे तुकडे करून ते चोरून नेत असल्याचे आढळून आले.
यावेळी घटनास्थळी सुमारे ३ किलो वजनाचे चंदनाच्या झाडाचे तुकडे मिळाले असून त्याची किंमत अंदाजे बारा हजार इतकी आहे. या प्रकरणी आरोपी म्हणून महेश मुकेश भोसले (वय २८), अंकिता मैनेष भोसले (वय २५, दोघे रा. भादे, ता. खंडाळा, जि. सातारा) आणि गायत्री जकल पवार (वय ४०, रा. शेडगेवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) यांची नावे समोर आली आहेत. आरोपींनी फिर्यादीची संमती न घेता झाडांची तोड करून चोरीचा प्रयत्न केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या जागरूकतेमुळे चंदन तस्करीचा हा प्रकार उघडकीस आला असून, राजगड पोलीस स्टेशनकडून पुढील तपास सुरू आहे.





