Samir Rizvi Record : समीर रिझवीचा दिल्लीत ऐतिहासिक धमाका! मुंबईविरुद्ध मोडला श्रेयस अय्यरचा १० वर्षांपूर्वीचा विक्रम
Samir Rizvi Record : समीर रिझवीने अशा काही फटक्यांची आतषबाजी केली की, त्याने थेट आयपीएलच्या रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे.

Samir Rizvi record against Mumbai Indians IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सचा नवा ‘स्टार’ समीर रिझवीने शनिवारी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची पिसं काढली. १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने ५१ चेंडूत ९० धावांची तुफानी खेळी केली. या खेळीसह रिझवी आता आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा ‘अनकॅप्ड’ (ज्याने अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही) भारतीय फलंदाज ठरला आहे.
यशस्वी जैस्वाल अव्वल स्थानी कायम –
मुंबईविरुद्ध ‘अनकॅप्ड’ खेळाडू म्हणून सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम यशस्वी जैस्वालच्या (१२४ धावा) नावावर आहे. त्यानंतर आता समीर रिझवी (९० धावा) दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने २०१५ मध्ये श्रेयस अय्यरने केलेल्या ८३ धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
Making it count AGAIN 👏
Sameer Rizvi with another match-winning knock 🔝
Catch his clutch innings ▶️ https://t.co/1gg8xysuFU#TATAIPL | #KhelBindaas | #DCvMI | @DelhiCapitals pic.twitter.com/jNywJTDRka
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2026
मुंबईविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे अनकॅप्ड खेळाडू:
- यशस्वी जैस्वाल – राजस्थान रॉयल्स – १२४ धावा – ३० एप्रिल २०२३
- समीर रिझवी – दिल्ली कॅपिटल्स – ९० धावा – ४ एप्रिल २०२६
- श्रेयस अय्यर – दिल्ली कॅपिटल्स – ८३ धावा – २३ एप्रिल २०१५
सेहवाग-रॉयच्या यादीत पटकावलं स्थान –
केवळ अनकॅप्ड खेळाडू म्हणूनच नाही, तर दिल्ली कॅपिटल्सच्या इतिहासात मुंबईविरुद्ध सर्वाधिक वैयक्तिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही रिझवी तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दिल्लीसाठी मुंबईविरुद्ध वीरेंद्र सहवागने ९५* आणि जेसन रॉयने ९१* धावा केल्या होत्या. रिझवीने आपल्या ९० धावांच्या खेळीत ७ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार खेचले. या दमदार कामगिरीमुळे दिल्लीने हा सामना १८.१ षटकातच खिशात घातला.
मुंबईविरुद्ध दिल्लीच्या फलंदाजांचे सर्वोच्च धावसंख्या:
- वीरेंद्र सहवाग: ९५* (२०१३)
- जेसन रॉय: ९१* (२०१८)
- समीर रिझवी: ९० (२०२६)





