श्रीरामपूर – तालुक्यातील दत्तनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत समता प्रतिष्ठानच्या वतीने आगळा-वेगळा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वही, पेन आणि उजळणी साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब शिंदे होते. यावेळी बोलताना शिंदे यांनी शाळेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आश्वासन दिले. ते म्हणाले, “पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून शाळेला लवकरच चांगली, प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली जाईल. लहान मुलांसाठी खेळण्याची व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी विशेष जागा निर्माण केली जाईल. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शाळा भेटीसाठी घेऊन येत पाहणी करण्यात येईल.” समता प्रतिष्ठानच्या कार्याची प्रशंसा करताना शिंदे म्हणाले, “सहामहिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या प्रतिष्ठानने अल्प काळात सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.” समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद चावरे यांनी संस्थेच्या उपक्रमाची माहिती देताना सांगितले, “गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांची गरज भागवण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यातही असे अनेक उपक्रम हाती घेतले जातील.” या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष देविचंद गायकवाड, यश आल्हाट, अनिल पवार, मनोज जोशी, नाना बिर्हाडे, भैय्या जहागीरदार, नामदेव साबळे, नितीन गायकवाड, प्रकाश बाजारे, दीपक कुंचरला, अरुण साळवे, योगेश दुधे, सोनू बागुल, राजू बिर्हाडे, विजय कोळगे, राजू बर्डे, प्रशांत अंबिलवादे, सागर काळे, मयूर एडके, उमेश गायकवाड, सिकंदर पटेल, कुणाल चावरे, आलोक चावरे, स्तवन दुशिंग यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खाजेकर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका थोरात उपस्थित होत्या. त्यांनी नानासाहेब शिंदे यांचे शाळेच्या वतीने आभार मानले आणि त्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.