खेड तालुक्याच्या महाविकास आघाडीत मिठाचा खडा; अतुल देशमुखांच्या वक्तव्यावरुन शिवसेनेत नाराजी

शेलपिंपळगाव – खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील जागा आपल्या पक्षाला मिळावी आणि पर्यायाने ती उमेदवारी मलाच मिळावी यासाठी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांतील इच्छुक उमेदवारांची अंतर्गत लढाई सुरू आहे. त्यातच काल खेड तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा जात असताना एका सभेत राष्ट्रवादीच्या अतुल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश गोरे अपघाताने निवडून आले. त्याचा साक्षीदार मी आहे, आमची चूक आता आमच्या लक्षात आली आहे, असं म्हणत रामदास ठाकूर यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. शिवसेनेला अतुल देशमुख यांनी एकप्रकारे डिवचले असल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे.
यापूर्वी देखील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश गोरे यांच्या परभावासाठी कारणीभूत ठरलेल्या देशमुख यांच्यावर शिवसैनिकांची नाराजी होती त्यातच पुन्हा एकदा अतुल देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना पंचायत समितीच्या सत्ता नाट्यावरुन आमदार दिलीप मोहिते आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये वाकयुध्द रंगले होते. त्यावेळी खेड तालुक्याचा पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असेल अशी स्पष्ट भूमिका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती.
आता पुन्हा भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या अतुल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला आहे. यापूर्वी देखील अतुल देशमुख यांच्या प्रवेशावर महाविकस आघाडीतील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता या प्रकरणावर शिवसैनिकांच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.





