सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर; किडनी आणि एक डोळा कायमचा निकामी होण्याचाही धोका

न्यूयॉर्क – प्रख्यात लेखक सलमान रश्दी यांच्यावर काल जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांची लिव्हर आणि एक डोळा कायमचा निकामी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यांना अजून बोलताही येत नाही अशी स्थिती असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांच्यावर हल्ला करणारा युवक 24 वर्षीय असून तो न्यूजर्सी येथील राहणारा आहे.
हदी मातर असे त्याचे नाव आहे. द सॅटानिक व्हर्सेस हे सलमान रश्दी यांनी लिहिलेले पुस्तक वादग्रस्त ठरले असून त्यावरून इस्लामिक दहशतवाद्यांनी त्यांना ठार मारण्याचा फतवा या आधीच जारी केला होता. त्याच प्रकरणात त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, एफबीआयकडून या हल्ल्याचे नेमके कारण शोधण्यात येत आहे. हल्लेखोराला कालच घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले आहे. इमर्जन्सी मेडिकल टीम जागेवर येण्यापूर्वी प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या एका डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यामुळे त्यांचे प्राण त्यावेळी वाचू शकले आहेत. त्यांना नंतर एअर ऍम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्यात आले आहे.
काल रश्दी हे एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी गेले असताना तेथे सर्वांसमक्षच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या गळ्यावर वार झाले आहेत. रश्दी हे 75 वर्षीय आहेत. इस्लामिक कट्टरपंथीयांकडून धमक्या मिळाल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे ते अज्ञातवासातच होते. पण अलीकडच्या काळात ते सार्वजनिक ठिकाणी सहभागी होऊ लागले होते.




