Salman Rushdie : लेखक सलमान रश्दींवर प्राणघातक हल्ला करणाऱ्याला झाली ‘ही’ शिक्षा

मायविले : लेखक सलमान रश्दी यांच्यावर २०२२ साली एका कार्यक्रमात धारदारचाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या व्यक्तीला न्यायालयाने २५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या हल्ल्यामुळे रश्दी यांना आपला एक डोळा कायमचा गमवावा लागला होता. हादी मतचार असे हल्ला करणाऱ्या २८ वर्षे वयाच्या हल्लेखोराचे नाव आहे.
न्यायालयामध्ये शिक्षा सुनावली जात असताना तो शांतपणे उभा होता. त्याने सलमान रश्दींवर हल्ला केल्याचा आरोप नाकारला नाही. न्यायालयामध्ये मतार याने रश्दी यांचा अपमान देखील केला. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मानतो. मात्र रश्दी हे दुटप्पी आहेत. सलमान रश्दी यांना अन्य लोकांचा अवमान करायचा आहेस, असा आरोपही त्याने केला. रश्दींना इतरांना धमकावयाचे आहे. त्यांच्या या स्वभावाशी आपण सहमत नसल्याचेही त्याने सांगितले.
पश्चिम न्यूयॉर्कमधील न्यायालयाच्या सुनावणीला रश्दी उपस्थित राहिले नाहीत. मात्र हल्ल्यामुळे आपले जे नुकसान झाले, त्याबद्दलचे निवेदन त्यांनी न्यायालयात पाठवून दिले होते. जे काही झाले, ते आपल्यासाठी एक दुस्वप्तन होते, असे रश्दींनी म्हटले आहे. मतारला शिक्षा सुनावली गेल्यानंतर रश्दींनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मतार याने हल्ल्याच्यावेळी मास्क घातला होताआणि सुमारे डझनभरवेळा चाकूने वार केले होते. यावेळी रश्दी लेखकांच्या संरक्षणाच्या मुद्द्यावरच भाषण करणार होते. मतारला हत्येच्या प्रयत्नासाठीच्या आरोपात दोषी ठरवून २५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.





