अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस विजयी होतील; सलमान रश्दी यांनी व्यक्त केला विश्वास

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या संभाव्य उमेदवार आणि विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस याच विजयी होतील, असा विश्वास जागतिक किर्तीचे लेखक सलमान रश्दी यांनी व्यक्त केला आहे. देश माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकाधिकारशाहीकडे खेचून नेला जाण्याला कमला हॅरिस याच रोखू शकतील, असा विश्वास आपल्याला वाटत असल्याचे रश्दी यांनी म्हटले आहे.
आभासी माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये रश्दी यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला. या कार्यक्रमात दक्षिण आशियातील लोकांनी कमला हॅरिस यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यामध्ये प्रमुख कायदेतज्ज्ञ, लेखक, धोरण तज्ञ, उद्योजक आणि समुदाय संस्थांसह भारतीय-अमेरिकन समुदायातील अनेक प्रमुख प्रतिष्ठीत उपस्थित होते. रश्दी यांनी आपल्या भाषणामध्ये आपण मूळचे मुंबईचे असल्याचा आवर्जुन उल्लेख केला.
एक भारतीय वंशाची महिला अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार होत असल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. आपली पत्नी आफ्रिकन वंशाची आहे. त्यामुळेच व्हाइट हाउसमध्ये कृष्णवर्णिय भारतीय महिला यावी असे आपल्याला वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र वंशाचे एकमेव कारण पुरेसे नाही. या कारणाने आपण उषा वान्स (रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार जेडी वान्स यांच्या पत्नी) आणि निक्की हेले (साऊथ कॅरोलिनाच्या रिपब्लिकन पक्षाच्या माजी गव्हर्नर) यांनाही पाठिंबा द्यायला पाहिजे, असे रश्दी म्हणाले.
पर्याय स्वीकरू शकत नाही…
मात्र गेल्या आठवड्यात अत्यंत परिवर्तनकारी घटना अमेरिकेमध्ये घडल्या आहेत. कमला हॅरिस यांच्या उमेदवारीमुळे चित्र बदलून गेले आहे. आनंदी, उत्साही, आशादायक, सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. समाजाने ते काम केले पाहिजे कारण आपण हॅरिस यांना असलेला पर्याय स्वीकारू शकत नाही, असे रश्दी यांनी अधोरेखित केले.





