Salman Khan’s bodyguard : सलमानचा खास विश्वासू शेरा शोकाकुल; वडिलांचे निधन, आज अंत्यसंस्कार

Salman Khan’s bodyguard : बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा विश्वासू बॉडीगार्ड शेरा याचे वडील सुंदरसिंग जॉली यांचे आज निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते आणि गेल्या काही काळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्या पार्थिवावर आज ओशिवरा, जोगेश्वरी पश्चिम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
शेराने अधिकृत निवेदनात म्हटले आहे, “माझे वडील श्री. सुंदरसिंग जॉली आज स्वर्गवासी झाले आहेत. त्यांची शेवटची यात्रा आज सायंकाळी ४ वाजता निघेल.”
केवळ काही महिन्यांपूर्वीच शेराने आपल्या वडिलांचा ८८वा वाढदिवस साजरा करत त्यांना “आपले हिरो” संबोधले होते. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते, “माझा देव, माझे वडील, माझी प्रेरणा! मी कायम तुमच्यावर प्रेम करत राहील.”
शेरा कोण आहे?
शेराचे खरे नाव गुरमितसिंग जॉली आहे. तो १९९५ पासून सलमान खानचा खासगी अंगरक्षक आणि सुरक्षा प्रमुख आहे. त्याने ‘टायगर सिक्युरिटी’ नावाची सुरक्षा कंपनी स्थापन केली असून, अनेक नामांकित कलाकारांसाठी सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. २०१७ मध्ये जस्टिन बीबरच्या मुंबई कॉन्सर्टदरम्यान त्याच्या सुरक्षेची जबाबदारी शेराकडेच होती.
शेरा हा एक व्यावसायिक बॉडीबिल्डरही आहे. १९८७ मध्ये त्याने मुंबई ज्युनिअर बॉडीबिल्डिंग स्पर्धा जिंकली होती, आणि १९८८ मध्ये मिस्टर महाराष्ट्र ज्युनिअर स्पर्धेत उपविजेता ठरला होता. १९९० च्या दशकात त्याने अंगरक्षक म्हणून काम सुरू केले आणि लवकरच सलमान खानसोबत जोडला गेला.
सलमान खान सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, ईदच्या शुभेच्छा देताना किंवा वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना भेट देताना, शेरा कायम त्याच्या शेजारी दिसतो.
सलमान खानच्या बॉडीगार्ड शेराचे वडील सुंदरसिंग जॉली यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले असून त्यांचे अंत्यसंस्कार आज ओशिवरा स्मशानभूमीत होणार आहेत.


