Pune Gramin : भोर तालुक्यात विना परवाना फटाक्यांची विक्री; अधिकृत विक्रेत्यांचा संताप

नसरापूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यात विविध ठिकाणी फटाक्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरु झाली आहे. मात्र अनेक दुकाने आणि स्टॉल विना परवाना चालवले जात असल्याचं समोर आलं आहे. अशा अनधिकृत विक्रेत्यांविरोधात प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी भोर फटाका असोसिएशनने तहसीलदार राजेंद्र नजन यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
असोसिएशनचे कार्याध्यक्ष संतोष भारतयो, उपाध्यक्ष सुरेश तुपे, खजिनदार कन्हेंचा मुजर, आणि सचिव साजिद आसार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात असं म्हटलं आहे की, “आम्ही सर्व स्टॉल धारक प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियोजित जागेतच फटाक्यांची विक्री करतो. नगरपरिषद अधिकारी नियमित पाहणी करतात आणि आम्ही सर्व नियमांचं काटेकोर पालन करतो. मात्र भोर तालुक्यातील काही गावांमध्ये काही जण खुलेआम, तर काही छुप्या पद्धतीने विना परवाना फटाके विक्री करत आहेत. यामुळे नियम पाळणाऱ्या स्टॉल धारकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.”
असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, ‘निर्भय भारत’ नावाची सामाजिक संस्था मागील तीन वर्षांपासून भोर तालुक्यात विना परवाना फटाके विकत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ही संस्था बांधकाम कामगारांना सरकारी योजनेअंतर्गत भांडी व पेटी देण्याचं काम करते, मात्र त्याचाच गैरफायदा घेऊन कामगारांच्या नावावर फटाके विक्री केली जाते, असं निवेदनात नमूद आहे.
गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणाबाबत भोर नगरपरिषद आणि पोलिस स्टेशनला लेखी तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप असोसिएशनने केला आहे. “विना परवाना फटाके विक्रीतून जर काही अपघात, आग किंवा जीवितहानी झाली, तर जबाबदारी कोणाची राहील?” असा गंभीर प्रश्न आता नागरिक आणि विक्रेते वर्गामध्ये निर्माण झाला आहे.
भोर तालुक्यातील बाजारपेठांमध्ये आणि गावांमध्ये सध्या फटाक्यांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उभे राहत आहेत. प्रशासनाने सर्व स्टॉलची परवानगी तपासावी, आणि अनधिकृत स्टॉल तात्काळ बंद करावेत, अशी ठाम मागणी असोसिएशनकडून करण्यात आली आहे. दरम्यान, भोर तालुक्यातील नागरिक आणि व्यापारी वर्गाकडूनही आता प्रशासनाने तातडीने कारवाई करून अनधिकृत फटाके विक्री थांबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




