किसन वीर कारखान्यासाठी अजितदादांना साकडे

सातारा -किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्ष हालचाली सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिल्याप्रमाणे शनिवारी मंत्रालयामध्ये किसन वीर सहकारी साखर कारखान्यांच्या संचालकांची बैठक घेऊन कारखान्याच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेतल्या. राज्य शासनाने राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून किसन वीर कारखान्याच्या आर्थिक देणी देण्याकरिता मदत करावी, अशी मागणी संचालक मंडळाच्यावतीने आमदार मकरंद पाटील व जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी अजित पवार यांच्याकडे केली.
किसनवीर सहकारी साखर कारखान्यातील माजी आमदार मदन भोसले यांची सत्ता आमदार मकरंद पाटील यांनी उलथवून टाकली आहे. कारखान्यात विजय मिळाला तरी खऱ्या जबाबदारीला सुरुवात झाल्याने आमदार मकरंद पाटील यांनी त्या पद्धतीने हालचाल सुरू केली आहे. मकरंद पाटील व नितीन पाटील आणि कारखान्याच्या संचालक मंडळाने शनिवारी मुंबईत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सुमारे सव्वा तास झालेल्या या बैठकीमध्ये दादांनी किसन वीर कारखान्याच्या सर्व अडचणी तपशीलवार जाणून घेतल्या. कारखान्याची मूळ थकीत रक्कम, थकीत देणी, बंद पडलेल्या प्रकल्पांची परिस्थिती, गाळप हंगाम तसेच खंडाळा सहकारी साखर कारखाना व प्रतापगड सहकारी साखर कारखाना यांच्यासाठी झालेला खर्च, इतर अतिरिक्त देणी आणि लागू झालेले व्याज याची सविस्तर मांडणी या बैठकीत करण्यात आली. ही सर्व आकडेवारी अजित पवार यांनी नोंदवून घेतली.
कर्जमुक्तीचा प्रवास लवकरच ः पवार
राज्य शासनाने सहकार क्षेत्रातील शिखर बॅंक असणाऱ्या राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक देण्याकरिता मदत करावी तसेच 52 हजार शेतकऱ्यांची मालकी कारखान्यावर कायम राहावी या दोन मागण्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने करण्यात आल्या. यासंदर्भामध्ये राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून कर्जफेडीकरता कोणती सकारात्मक पावले उचलता येतील याची लवकरच चर्चा करून योग्य तो तोडगा काढू असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या कर्जमुक्तीचा प्रवास लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही त्यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाला दिली आहे.





