सई ताम्हणकर झळकणार हिंदी सिनेमात; ‘या’ अभिनेत्रीसोबत करणार एकत्र काम

Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर हिने मराठीसह हिंदी सिनेमात देखील काम केले आहे. सईचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. तिच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच तिचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
या चित्रपटानंतर सई पुन्हा एकदा नेटफ्लिक्सवरील ‘भक्षक’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सई ‘जस्मीत गौर’ या एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत बॉलीवूडमधील अनेक बडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. यात भूमी पेडणेकर, सई ताम्हणकर आणि संजय मिश्रा यांच्या मुख्यभूमिका असणार आहेत.
‘भक्षक’च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता 9 फेब्रुवारीला भक्षक नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार यामुळे त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरं जावे लागतं यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे.
चित्रपटाविषयी सांगायचे झाले तर, भक्षक ही एका महिलेची कथा आहे, जी न्यायासाठी लढत असते. वैशाली सिंगच्या रोलमधील भूमी पेडणेकर एका शोध पत्रकाराची भूमिका साकारत आहे. जिला महिलांवरील गुन्ह्यांचे वास्तव समोर आणून एक भयंकर गुन्हा उघडकीस आणायचा आहे. यापूर्वी सई अभिनेत्री क्रीती सेनॉनसोबत ‘मिमी’ सिनेमात दिसली होती. सरोगसी या विषयावर आधारीत या सिनेमात शमा आणि मिमी या दोन मैत्रिणींमधील बाँडिग दाखवण्यात आले होते.





