Sai Tamhankar : ठसकेबाज लावणीतून ‘सई ताम्हणकर’ अमृता खानविलकरला देणार टक्कर! ‘या’ चित्रपटात झाली एन्ट्री

Sai Tamhankar | Devmanus : 2025 वर्ष सुरू झाल्यापासून अनेक नव्या मराठी सिनेमांची घोषणा झाली आहे. तर काही सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यात दिवसागणिक वाढ होत असून आता ‘देवमाणूस’ या नव्या मराठी सिनेमाची घोषणा झाली आहे.
‘देवमाणूस’ या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रेणुका शहाणे आणि महेश मांजरेकर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. हा बहुप्रतीक्षित सिनेमा लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ हा एक मल्टिस्टारर सिनेमा आहे. ज्यामध्ये अभिनेते महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
‘देवमाणूस’बद्दल बोलताना दिग्दर्शक तेजस देऊस्कर म्हणतात, “देवमाणूस प्रेक्षकांना वेगवेगळ्या भावनांचा अनुभव देईल. यात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थसारखे उत्तम कलाकार आहेत.
त्यांच्यामुळे चित्रपटात असलेली पात्र मी पडद्यावर जिवंत करू शकलो. आम्ही निर्माण केलेले हे जग प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मी उत्सुक आहे.” असं ते म्हणतात. देवमाणूस या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.
दरम्यान नुकतीच या चित्रपटातील महत्वपूर्ण गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री ‘सई ताम्हणकर’ पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे.
सईची ठसकेबाज लावणी चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दल बोलताना स्वतः सई म्हणते, “पहिल्यांदाच मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन लावणी सादर करत आहे आणि माझ्या चाहत्यांनी ती पाहावी, यासाठी मी खूप उत्सुक आहे.
आत्ताच फार काही सांगू शकत नाही, मात्र मी जे काही सादर करणार आहे, ते प्रेक्षकांसाठी एक नवीन आणि वेगळा अनुभव ठरेल, याची मला खात्री आहे!’ अशी भावना अभिनेत्रीने बोलून दाखवली आहे.
दरम्यान, पहिल्यांदाच ‘सई ताम्हणकर’ मोठ्या पडद्यावर लोककला सादर करताना दिसणार आहे. लावणीच्या माध्यमातून सई अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकरला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे चाहते तिच्या नृत्याची आतुरतेने वाट पाहताय.





