सई ताम्हणकरने अनिशसोबत ब्रेकअप झाल्याची दिली कबुली

Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकर अभिनयासह तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत असते. अनेकदा सई आणि बॉयफ्रेंड अनिश जोगच्या नात्याबद्दल चर्चा रंगली. मात्र सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून निर्माता अनिश जोगसोबतचे फोटो डिलिट केले होते. त्यानंतर आता सईने अलीकडेच एका मुलाखतीमध्ये त्यांचा ब्रेकअप झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सईने तिच्या ब्रेकअपचा खुलासा केला आहे. ब्रेकअपबद्दल दोघांच्याही भावना सारख्याच असल्याचे सईने म्हटले. “आमचे मार्ग वेगळे झाले आहेत आणि आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय खूप कठीण होता पण तो घ्यावा लागला. माझ्या आयुष्यातील तो खूप खास व्यक्ती आहे आणि नेहमीच राहील. मी कायमच त्याच्या चांगल्यासाठी प्रार्थना करेन, मला त्याच्याबद्दल नेहमी आदर राहील,” अशी भावना सईने व्यक्त केली.
अनिशला डेट करण्यापूर्वी सईने व्हिज्युअल इफेक्ट्स आर्टिस्ट अमेय गोसावीशी लग्न केलं होतं. या दोघांनी 2013 मध्ये लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच ते विभक्त झाले. अनिशने सईच्या बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यानंतर दोघे अनेकदा एकत्र पाहायला मिळाले. मात्र आता दोघांचे ब्रेकअप झाले असल्याचे स्वत: सईने सांगितले आहे. Sai Tamhankar |
दरम्यान, सई लवकरच ‘ग्राऊंड झिरो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा छाप निर्माण करणाऱ्या सईचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक देखील आतुरतेने वाट पाहत असतात.





