Sahyadri Tiger Reserve – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची वंशवृद्धी होत असतानाच प्राणीप्रेमींना सुखद धक्का बसला आहे. व्याघ्र प्रकल्पातील कॅमेरा ट्रॅपमध्ये दुर्मिळ ‘ब्लॅक पॅंथर’चा (काळा बिबट्या) फोटो कैद झाला असून सह्याद्रीतील जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील काळे बिबटे (मेलॅनिस्टिक बिबटे) दुर्मीळ, सहजासहजी न दिसणारे आहेत. विशेषतः सह्याद्री पर्वतरांगांच्या घनदाट जंगलांमध्ये त्यांच्या नोंदींची संख्या वाढत आहे. तिलारी, राधानगरी, रत्नागिरी परिसरात ‘ब्लॅक पॅंथर’ची निरीक्षणे जास्त प्रमाणात नोंदविण्यात आली आहेत. आणि ही ठिकाणे जास्त पर्जन्यमानाची आहेत. ही निरीक्षणे जास्त पर्जन्यमानाच्या प्रदेशातील ‘ब्लॅक पॅंथर’च्या अस्तित्वावर प्रकाश टाकतात. त्याठिकाणी त्यांच्या गडद कातडीमुळे त्यांना उत्कृष्ट छलावरण मिळते, असे प्राणी तज्ज्ञांचे मत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातही यापूर्वी ‘ब्लॅक पॅंथर’ आढळून आले आहेत. मात्र, त्याच्या नोंदी कमी प्रमाणात आहेत. यावेळी प्रकल्पातील कॅमेरा ट्रॅपमध्ये ‘ब्लॅक पॅंथर’चा फोटोच कैद झाला असल्यामुळे त्याच्या अस्तित्वाचा ठोस पुरावाच हाती लागला आहे. दुर्मिळ ‘ब्लॅक पॅंथर’चा वावर आढळून आल्याने प्राणीप्रेमी सुखावले आहेत. “काळे बिबटे म्हणजेच ब्लॅक पॅंथर ही वेगळी प्रजाती नाही. त्यांच्यामध्ये झालेल्या जनुकीय उत्परिवर्तनामुळे त्यांचा रंग गडद झाला आहे. ज्यामुळे त्यांना घनदाट, ओलसर आणि सावलीच्या जंगलांमध्ये छद्मावरण करण्यास मदत होते. सह्याद्री हे जगातील जैवविविधतेने समृद्ध असे महत्वाचे स्थान ठरले आहे. लवकरच लुप्त होण्याच्या धोका असलेल्या व केवळ याच भागात आढळणाऱ्या वनस्पती, प्राणी, पक्षी, व इतर प्रजाती यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व पश्चिम घाट समृद्ध आहे.” -रोहन भाटे (मानद वन्यजीव रक्षक, कराड)