Ambegaon forest fire – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगररांगांमध्ये सुरू असलेल्या वणव्यांमुळे निसर्गसंपदा आणि पर्यावरण साखळी धोक्यात आली आहे. डोंगररांगाचे, घाटांचे आणि पर्यटनक्षेत्रांचे निसर्गसौदर्यही खराब होत आहे. औषधी वनस्पती, जंगली प्राणी, पक्षी व कीटकांचाही मृत्यू होतो. याशिवाय वणव्यांमुळे कोट्यवधी रुपयांची वित्तहानी अन् अनमोल जीवितहानीही मोठ्या प्रमाणात होत आहे. आंबेगाव तालुक्यात सध्या वृक्षतोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असतानाच आता वणवे लावणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. यांवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत जनजागृती करण्यात संबंधित प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. वणव्याची घटना घडल्यानंतरच याकडे लक्ष दिले जाते. वणव्यांमुळे एरवी ही हिरवेगार दिसणारे डोंगर सध्या काळेकुट्ट दिसत आहेत. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जानेवारी महिन्यापासून गावागावात जाऊन वणव्यांविषयी जनजागृती करायला हवी. मात्र, संबंधित विभागांकडून कोणतीही हालचाल जनजागृती होत नाही. तसेच वनव्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित विभागाचे कर्मचारी पोहोचण्यास उशीर होतो. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, वनव्यांमुळे वनांचे होणारे नुकसान व त्याचा आपल्या जीवनावर होणारे दुष्परिणाम याची माहिती, याबाबतच्या कायद्यादयातील तरतूदी, स्थानिक लोकांनी करावयाच्या उपाययोजना, लोकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये याबाबतची माहिती दूरदर्शन, प्रसारमाध्यमे, ग्रामसभा, छापील साहित्य याव्दारे लोकांना सांगून त्यांचे प्रबोधन करावे. गवत, पालापाचोळा जळून राख झाल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक नष्ट होतात. वनस्पती पुननिर्मितीला बाधा येते. चारा मिळेनासा होऊन जनावरे त्यासाठी भटकंतात. वनात पडलेली व वाळलेली झाडेझुडपे जळतात. पाणी जिरण्याची क्षमता नष्ट होते… वारंवार लागणाऱ्या आगीमुळे उघड्या पडलेल्या जमिनीवर पावसाचे पाणी थेट वेगाने पडते, जमिनीची सुपीक मातीचा थर पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो. जमिनीची धूप होऊन पाणी धारण करण्याची क्षमता नष्ट होते. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावते, विहिरी, तलाव वेळेपूर्वीच आटू लागतात, आदिचा परिणाम आगीमुळे होत आहे. तसेच कीडभक्षी, पक्ष्यांची घरटी, अंडी, पिल्ले, प्राणी जळून खाक होतात. विविध फळझाडे, बहुगुणी वनौषधी वणव्यांमुळे जळून खाक होत चालली आहे.