केंद्र सरकारच्या निर्णयाचे सहकार भारतीकडून स्वागत

वाई -उसाला एफआरपी व एमएसपीपेक्षा जादा दर देणाऱ्या साखर कारखान्यांना ऊस खरेदीवर प्राप्तिकरातून सवलत देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या निर्णयाचे सहकार भारतीच्यावतीने स्वागत करण्यात येत आहे, असे सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख व किसन वीर साखर कारखान्याचे संचालक, सीए. चंद्रकांत काळे यांनी सांगितले.
सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. शशिताई अहिरे (नाशिक) व महामंत्री विवेक जुगादे (नागपूर) यांनीही या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. काळे म्हणाले, केंद्र सरकारने कायद्यात नुकतीच दुरुस्ती करून उसाला एफआरपी किंवा एमएसपीपेक्षा दिलेला जादा दर, हा ऊस खरेदीचा खर्च समजून त्यावर प्राप्तिकर न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे अनेक साखर कारखान्यांचे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी पूर्वलक्ष्यी प्रभावाने 1 एप्रिल 2016 पासून होणार असल्याने साखर कारखानदारांचा, पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. हंगाम संपल्यानंतर काही कारखान्यांकडून एफआरपीपेक्षा जादा रक्कम ऊस उत्पादकांना दिली जाते. त्यावर प्राप्तिकर भरावा लागत असल्याने, कारखान्यांवर आर्थिक बोजा पडत होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ना. अमित शहा यांची भेट घेऊन साखर कारखान्यांना प्राप्तिकराच्या ओझ्यातून मुक्त करण्याची विनंती केली होती. शिष्टमंडळात राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, आ. राधाकृष्ण विखे-पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांचा समावेश होता.
या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर केंद्र सरकारने एफआरपी व एसएमपीपेक्षा जादा दिलेले पैसे हा कारखान्यांचा नफा न धरता तो ऊस खरेदीचा खर्च समजावा, असा बदल कायद्यात केल्याचे परिपत्रक काल जारी केले.
दरम्यान, सहकार भारतीच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मागील वर्षापासून नागरी बॅंकांमधील पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण लागू केले आहे. साखर कारखान्यांप्रमाणे सहकारी बॅंकांनाही प्राप्तिकर कायदा 80 पी अन्वये पूर्वीप्रमाणे मिळणारी सूट द्यावे, अशी मागणी सहकार भारतीने केली आहे.
सहकार भारतीचे प्रदेश संघटन मंत्री संजय परमणे, कोल्हापूर विभागप्रमुख श्रीकांत पटवर्धन, सहप्रमुख नरेंद्र गांधी, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, विनय भिसे, अविनाश जोशी, मिलिंद पुरोहित, विद्याधर तावरे, प्रदीप दीक्षित, रवींद्र भोसले, आनंद शेलार, लक्ष्मीकांत अघोर, विजयकुमार मुळीक, नंदकुमार बागवडे, देवानंद शेलार, प्रशांत नागपूरकर, सचिन गांधी यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.





