सातारा – राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी सागर भोगावकर

सातारा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी सातारा येथील सागर भोगावकर यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य अध्यक्ष जितेंद्र सातव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांच्या हस्ते भोगावकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून प्रेरणा घेऊन, सागर भोगावकर यांनी आपल्या सामाजिक कार्यास प्रारंभ केला. त्यामुळे त्यांची आम आदमी पक्षाच्या जिल्हा सचिवपदी निवड झाली होती. त्यांनी करोना काळात वाड्यावस्त्यांमध्ये स्वखर्चाने अन्नाची पाकिटे दिली. या कामाची दखल घेऊन, त्यांची आम आदमी पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली होती.
भोगावकर यांनी पक्षाचे विविध मेळावे घेऊन कार्यकर्त्यांची फळी तयार केली. भोगावकर यांनी काही कारणास्तव आम आदमी पक्षाचा राजीनामा देऊन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भोगावकर यांचे काम आणि जनसंपर्क पाहून पक्षाच्या वैद्यकीय मदत कक्ष राज्य उपाध्यक्षपदी त्यांची एक वर्षाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर बोलताना भोगावकर म्हणाले, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून, यापुढे माझी वाटचाल राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील एक नंबरचा पक्ष व्हावा, यासाठी पक्षाची ध्येयधोरणे समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.





