सदानंद दाते बनणार राज्याचे पोलीस प्रमुख? महाराष्ट्र केडरमध्ये परतले, कोण आहेत ‘ते’ जाणून घ्या

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख सदानंद दाते भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) महाराष्ट्र केडरमध्ये परतले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे राज्याच्या पोलीस प्रमुखपदाची सुत्रे सोपवणी जाणे निश्चित मानले जात आहे.
दाते यांना मागील वर्षी मार्चमध्ये केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले. त्यांना एनआयएचे महासंचालक बनवण्यात आले. त्यांना मूळ महाराष्ट्र केडरमध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक बनण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते.
विद्यमान पोलीस प्रमुख रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ नववर्षात समाप्त होईल. त्या ३ जानेवारीला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी नवे पोलीस प्रमुख म्हणून दाते यांचे नाव आघाडीवर आहे. आता त्यांना एनआयएच्या प्रमुख पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
त्यामुळे ते नववर्षात पोलीस प्रमुख म्हणून नवी जबाबदारी स्वीकारतील, असे सूचित होत आहे. दाते यांनी याआधी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख म्हणूनही कार्य केले.
कोण आहेत सदानंद दाते?
डॉ. सदानंद वसंत दाते हे महाराष्ट्र केडरचे १९९० बॅचचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या (डिसेंबर २०२५) राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) चे महासंचालक (Director General) पदावरून महाराष्ट्र राज्यात परत आले असून, महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक (DGP) होण्याची जोरदार शक्यता आहे. विद्यमान DGP रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपत असल्याने, केंद्र सरकारने त्यांना तात्काळ महाराष्ट्र केडरमध्ये परत आणण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांचे प्रमुख योगदान काय?
२००८ च्या मुंबई हल्ल्यादरम्यान त्यांनी दहशतवादी अजमल कसाब आणि अबू इस्माईल यांच्याशी थेट सामना केला, महिलांना आणि मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला. या शौर्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक फॉर गॅलंट्री (PPMG) ने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कारकिर्दीत ते महाराष्ट्र ATS (Anti-Terrorism Squad) चे प्रमुख, मुंबई क्राइम ब्रांच प्रमुख, मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिस आयुक्त, CBI मध्ये DIG, CRPF मध्ये IG (Operations) अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
शैक्षणिक पार्श्वभूमी काय?
पुणे विद्यापीठातून पीएच.डी., कॉमर्समध्ये मास्टर्स आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया कडून क्वालिफाइड कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट.
इतर सन्मान
२००७ आणि २०१४ मध्ये राष्ट्रपती पोलिस पदक फॉर मेरिटोरियस/डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस.





