Asia Cup 2025 : ‘जो आवडत नाही, त्याला तो संघातून वगळतो…’, गौतम गंभीरवर माजी भारतीय खेळाडूचा गंभीर आरोप

Sadagopan Ramesh slam Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरने जुलै 2024 मध्ये सूत्रे हाती घेतल्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये अनेक बदल घडले आहेत. या काळात रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या कसोटी संघातील तीन दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली आहे. गंभीरच्या धोरणांवर काही जण सहमत असले, तरी अनेकांनी त्याच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. यामध्ये माजी भारतीय सलामीवीर सदागोपन रमेश यांचे नाव आता समाविष्ट झाले आहेत.
माजी खेळाडू सदागोपन रमेश गंभीरबद्दल काय म्हणाले?
सदागोपन रमेश यांनी प्रशिक्षक गौतमरवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, तो केवळ आपल्या आवडीच्या खेळाडूंनाच पाठिंबा देतो. गंभीरच्या प्रशिक्षकपदाच्या काळात भारतीय संघाला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. त्याच्या नेतृत्वाखालील सुरुवातीच्या काही मालिकांमध्ये संघाला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेत भारताने 2-2 अशी बरोबरी साधली, ही बाब सकारात्मक मानली जात आहे.
गंभीर केवळ आपल्या आवडीच्या खेळाडूंना पाठिंबा देतो –
याच मालिकेवर बोलताना रमेश यांनी आपले मत मांडले. त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले, “गंभीर केवळ आपल्या आवडीच्या खेळाडूंना पाठिंबा देतो, तर जे त्याला आवडत नाहीत, त्यांना पूर्णपणे वगळले जाते. इंग्लंडमधील बरोबरीची मालिका मोठी उपलब्धी वाटत आहे, कारण मागील वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये आपले प्रदर्शन खराब होते. पण परदेशात सातत्याने विजय मिळवण्याची सुरुवात विराट कोहली आणि रवि शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली बराच काळ आधी झाली होती. आता केवळ बरोबरीच्या मालिकेला गंभीरच्या रेकॉर्डमध्ये मोठी उपलब्धी म्हणून पाहिले जात आहे.”
अय्यर-जैस्वालची निवड व्हायला हवी होती –
याशिवाय, रमेश यांनी आशिया कपसाठी निवडलेल्या भारतीय संघावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “श्रेयस अय्यर आणि यशस्वी जैस्वाल यांना या आशिया कपसाठी निवडले गेले पाहिजे होते. गंभीरची सर्वात मोठे यश म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजय, ज्यामध्ये श्रेयस अय्यरचा मोठा वाटा होता. तरीही गंभीर त्याला पाठिंबा देत नाही. यशस्वी जैस्वालसारखा एक्स-फॅक्टर खेळाडू सर्व फॉरमॅटमध्ये खेळायला हवा, त्याला स्टँडबाय ठेवणे हा चुकीचा निर्णय आहे.”
हेही वाचा – आशिया कप निवडीनंतर BCCI चा मोठा निर्णय, नवीन निवड समिती सदस्यांसाठी मागवले अर्ज
गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदावरून सुरू असलेली ही टीका भारतीय क्रिकेटमधील सध्याच्या चर्चेचा विषय बनली आहे. त्याच्या धोरणांमुळे आणि खेळाडू निवडीमुळे यापुढेही अशा चर्चा सुरू राहण्याची शक्यता आहे.





