Sachin Shingda join MNS। राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अनेक इच्छुक उमेदवार मैदानात उतरण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांच्या वाटेवर जाताना दिसून येत आहेत . अशीच एक बातमी पालघरमधून समोर येत आहे. कारण महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पाच वेळा खासदारकी गाजवणाऱ्या काँग्रेसच्या खासदाराने पक्षाला रामराम ठोकला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभेला महायुतीला साथ देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला . त्यानंतर या पक्षांकडे जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. त्यातच पालघर तालुक्यातील काँग्रेसचे दोन प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत 13 ऑक्टोबर रोजी पक्ष प्रवेश करणार आहेत. यामध्ये माजी खासदार दामू शिंगडा यांचे सुपुत्र सचिन शिंगडा यांचाही समावेश आहे. सचिन शिंगडा विधानसभेसाठी इच्छुक Sachin Shingda join MNS। दामू शिंगडा हे काँग्रेसकडून त्यावेळच्या डहाणू लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा खासदार राहिले आहेत. दामू शिंगडा हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानले जात. 2021 साली कोरोनाने त्यांचे निधन झाले. आता त्यांचे सुपुत्र सचिन शिंगडा हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. सचिन शिंगडा पालघर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी आहेत. काँग्रेसच्या युवक संघटनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, लोकसभा युवक काँग्रेस सरचिटणीस अशी पदे त्यांनी सांभाळली आहेत. शिंगडा कुटुंबाचा विक्रमगड भागात जनसंपर्क दांडगा आहे. विक्रमगडमध्ये विद्यमान आमदार सुनील भुसारा हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता जवळपास नाही. सचिन शिंगडांनी घेतली राज ठाकरेंची भेट Sachin Shingda join MNS। त्यामुळेच सचिन शिंगडांनी मनसे प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. नुकतीच त्यांनी राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. सचिन शिंगडा यांनी 2014 मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघातून स्वबळावर निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. आता विधानसभेला ते कसे सामोरे जातात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.