SA20 Fire Incident : SA20 मध्ये थरार! स्टेडियममध्ये सुरू होता सामना; अचानक लागली आग अन् प्रेक्षकांची उडाली भंबेरी

SA20 Fire Incident during match : दक्षिण आफ्रिकेच्या SA20 लीगमध्ये शनिवारी पार्ल रॉयल्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान एका भीषण आगीच्या घटनेने चाहत्यांची धाकधूक वाढवली. बोलँड पार्क स्टेडियमच्या पार्किंग परिसरात अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. काही काळ मैदानावर भीतीचे वातावरण होते, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नेमकी घटना काय?
पार्ल रॉयल्सच्या फलंदाजीदरम्यान चौथ्या षटकात ही आग लागल्याचे निदर्शनास आले. स्टेडियमच्या पश्चिम बाजूला असलेल्या पार्किंग लॉटमध्ये आगीच्या ज्वाळा दिसू लागल्याने प्रेक्षकांचे लक्ष विचलित झाले. आपल्या गाड्यांना आग लागेल या भीतीने अनेक चाहते सामना अर्धवट सोडून पार्किंगच्या दिशेने धावले. दरम्यान, अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सातव्या षटकापर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. जवळच असलेल्या जंगलात लागलेल्या वणव्यामुळे आधीच परिसरात धुके आणि धूर होता, त्यात या आगीने अधिक भर घातली.
Scenes outside Paarl Stadium during #SA20. FIRE due to extensive heat wave and dry wind. Even mountains are on fire pic.twitter.com/QSF77XMjhB
— 𝗕𝗥𝗨𝗧𝗨 (@Brutu24) January 10, 2026
कमी धावसंख्येच्या सामन्यात प्रिटोरियाचा विजय –
या सर्व गोंधळात सामना मात्र थांबवण्यात आला नाही. प्रिटोरिया कॅपिटल्सने कमी धावसंख्या असूनही पार्ल रॉयल्सवर २१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना प्रिटोरिया कॅपिटल्सने २० षटकांत ९ बाद १३८ धावा केल्या. शेरफेन रदरफोर्डने सर्वाधिक ४२ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात १३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पार्ल रॉयल्सचा संघ २० षटकांत ६ बाद ११७ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
केशव महाराजची फिरकी ठरली निर्णायक –
भारतीय वंशाचा दक्षिण आफ्रिकन फिरकीपटू केशव महाराज याने प्रिटोरियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याने २ षटकांत १४ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. त्याला विहान लुब्बे, गिदोन पीटर्स आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेत चांगली साथ दिली.





