Duleep Trophy 2025 : ऋतुराज गायकवाडची झंझावाती खेळी! वेस्ट झोनची सेमीफायनलमध्ये मजबूत पकड

Ruturaj Gaikwad Smashed Century in Duleep Trophy : दुलीप ट्रॉफी 2025 च्या सेमीफायनल सामन्यात वेस्ट झोनची सुरुवात अडखळली होती, जेव्हा अवघ्या 10 धावांवर त्यांचे दोन गडी बाद झाले. पण, कर्णधार ऋतुराज गायकवाडने एकट्याच्या जीवावर संघाला सावरले आणि सेंट्रल झोनविरुद्धच्या या सामन्यात 184 धावांची दमदार खेळी करत वेस्ट झोनला मजबूत स्थितीत आणले.
ऋतुराजने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येत 206 चेंडूंमध्ये 25 चौकार आणि एका षटकारासह 184 धावांचा डोंगर उभा केला. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला फारशी साथ मिळाली नाही. सहाव्या क्रमांकापर्यंत कोणताही फलंदाज 40 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. आर्या देसाईने 39, तर श्रेयस अय्यरने 25 धावा केल्या. नंतर तनुष कोटियानने ऋतुराजला चांगली साथ देत अर्धशतक पूर्ण केले आणि बातमी लिहेपर्यंत तो खेळपट्टीवर टिकून होता.
ऋतुराज गायकवाड रेड बॉल क्रिकेटसाठी सज्ज –
Big players step up on big stages… Ruturaj Gaikwad’s sensational 184 rescues West Zone from 10/2 in the Duleep Trophy semi-final against Central Zone 🙌💛#DuleepTrophy #WZvsCZ #RuturajGaikwad pic.twitter.com/kbYdOuP86K
— OneCricket (@OneCricketApp) September 4, 2025
ऋतुराजने सेंट्रल झोनच्या तगड्या गोलंदाजीसमोर ही खेळी केली, ज्यामुळे त्याची रेड बॉल क्रिकेटसाठीची तयारी दिसून आली. खलील अहमदच्या एका षटकात त्याने चार चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याने सारांश जैनविरुद्ध 58 चेंडूंमध्ये 55 धावा, हर्ष दुबेविरुद्ध 75 चेंडूंमध्ये 48 धावा, खलीलविरुद्ध 24 चेंडूंमध्ये 37 धावा, यश ठाकूरविरुद्ध 24 चेंडूंमध्ये 25 धावा आणि दीपक चहरविरुद्ध 24 चेंडूंमध्ये 22 धावा कुटल्या. अखेरीस, सारांश जैनने त्याला उपेंद्र यादवकरवी झेलबाद केले.
ऋतुराजचे प्रथम श्रेणीतील ८ वे शतक –
या शतकासह ऋतुराज गायकवाडने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ८ वे शतक पूर्ण केले. त्याच्या नावावर १४ अर्धशतके देखील आहेत. ३९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये, गायकवाडने ४१ पेक्षा जास्त सरासरीने २७०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. गायकवाडने अद्याप भारतासाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्याच वेळी, त्याने ६ एकदिवसीय आणि २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे.
गेल्या काही महिन्यांत ऋतुराज गायकवाडसमोर बरेच चढ-उतार आले. आयपीएल 2025 मधून तो बाहेर पडला, इंडिया ए साठी त्याला संधी मिळाली नाही. पण, बुची बाबू स्पर्धेत शतक ठोकल्यानंतर आता दुलीप ट्रॉफीतही त्याने शतकी खेळी साकारली. या खेळीने त्याने आपली दावेदारी पुन्हा एकदा भक्कम केली आहे.





