Ruturaj Gaikwad Record : ऋतुराजचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात २२ वर्ष कोणाला जमलं नाही, ते मराठमोळ्या गड्याने करून दाखवलं

Ruturaj Gaikwad Record List A Cricket : भारताचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडने क्रिकेट जगतात असा पराक्रम केला आहे, जो आतापर्यंत जगातील कोणत्याही फलंदाजाला जमलेला नाही. त्याने ‘लिस्ट-ए’ (List A) क्रिकेटमध्ये सर्वाधिक फलंदाजी सरासरीचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू माइकल बेवनला मागे टाकले आहे. त्याने गोव्याविरुद्ध शतक झळकावत २२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याचा पराक्रम केला आहे.
बेवनचा ‘तो’ महान विक्रम आता ऋतुराजच्या नावे –
विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना ऋतुराजने आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडला आहे. गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर रुतुराज गायकवाडची ‘लिस्ट-ए’ क्रिकेटमधील सरासरी ५८.८३ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे त्याने केवळ ९५ सामन्यांतच हे शिखर गाठले आहे.
Ruturaj Gaikwad stands tall smashing an unbeaten century against Goa in the Vijay Hazare Trophy. He anchored the innings for Maharashtra when the team needed the most and played a captain’s knock 🏏#ruturajgaikwad #mcacricket #TeamMaharashtra #cricketmaharshtra… pic.twitter.com/uw4xAechCl
— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) January 8, 2026
यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या माइकल बेवनच्या नावावर होता. बेवनने ४२७ सामन्यांत ५७.८६ च्या सरासरीने धावा केल्या होत्या. गेल्या २२ वर्षांपासून हा विक्रम अबाधित होता, जो आता एका भारतीय फलंदाजाने मोडीत काढला आहे. या यादीत इंग्लंडचा सॅम हैन (५७.७६ सरासरी) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा – Virat Kohli Video : वडोदरा विमानतळावर विराट कोहलीला घेरले चाहत्यांनी, सुरक्षा रक्षकांची धावपळ, पाहा VIDEO
गोव्याविरुद्ध ठोकले झंझावाती शतक –
विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोव्याविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १३१ चेंडूत १३४ धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ६ उत्तुंग षटकार लगावले. ऋतुराजच्या या खेळीमुळे महाराष्ट्र संघ मजबूत स्थिती पोहोचला.
निवड समितीकडे कामगिरीने धाडलं उत्तर –
नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ऋतुराजने शानदार शतक झळकावले होते. असे असूनही, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या आगामी वनडे मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आलेली नाही. सातत्याने धावा करूनही संधी मिळत नसल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, ऋतुराजने आपल्या बॅटने पुन्हा एकदा निवड समितीचे दरवाजे ठोठावले आहेत.





