Ranji Trophy 2024 : ऋतूराजचे शतक हुकलं; महाराष्ट्राच्या पहिल्या डावात सर्वबाद 225 धावा…

Maharashtra Vs Services – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील अखेरच्या साखळी फेरीतील लढतीत महाराष्ट्राचा पहिला डाव २२५ धावांवर संपला. पहिल्या दिवसातील उर्वरीत खेळात सेनादल संघाने आपल्या पहिल्या डावात बिनबाद २७ धावा केल्या आहे. ते अद्याप १९८ धावांनी पिछाडीवर आहेत.
महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावणेने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतूराज गायकवाड, दिग्विजय पाटील व तरणजितसिंग धिल्लन यांचा अपवाद वगळता महाराष्ट्राच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर जम बसवता आला नाही. गायकवाडने अफलातून खेळी केली मात्र, त्याचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. त्याने १६१ चेंडूत ९ चौकार व १ षटकारासह ९६ धावांची खेळी केली.
या लढतीतून माघार घेतलेल्या केदार जाधवच्या जागी फलंदाजीला आलेल्या दिग्विजय पाटीलने ७५ चेंडूत ६ चौकारांसह ४२ धावांची खेळी केली. तळात तरणजित सिंग धिल्लन व नवोदित फलंदाज व १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्घा गाजवलेल्या सचिन धसने थोडी चमक दाखवल्यामुळे महाराष्ट्राला ७९ षटकांत सर्वबाद २२५ अशी समाधानकारक मजल मारता आली. सेनादलाकडून अर्जुन शर्माने ५ तर, वरुण चौधरीने ४ गडी बाद केले. महाराष्ट्राच्या धावसंख्येचा पाठलाग करताना सेनादलाने पहिल्या दिवसअखेर उर्वरीत ९ षटकांत एकही गडी न गमावता २७ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक – महाराष्ट्र पहिला डाव – ७९ षटकांत सर्वबाद २२५ धावा. (ऋतुराज गायकवाड ९६, दिग्विजय पाटील ४२, तरणजिंतसिंग धिल्लन ३४, अर्जुन शर्मा ५-५९, वरुण चौधरी ४-३९). सेनादल – पहिला डाव – ९ षटकांत बिनबाद २७ धावा. (शुभम रोहिल्ला खेळत आहे १४, नीतिन तनवर खेळत आहे ९).





